भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण आणि कल्याण जिल्हा भाजपचे सरचिटणीस नंदू जोशी यांच्याविरोधात मंगळवारी रामनगर पोलीस ठाण्यात जातिवाचक शिवीगाळ तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात  आला आहे. या प्रकरणी आणखी पाच जणांवर संशयित आरोपी म्हणून ठपका ठेवण्यात आला आहे.
महापालिकेतील सुरक्षारक्षक रमेश पौळकर (निलंबित) गेल्या सहा महिन्यांपासून या प्रकरणी तक्रार करण्यासाठी प्रयत्नशील होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री आर.आर.पाटील, पोलीस महासंचालकांकडे त्यांनी या प्रकरणी तक्रारी केल्या होत्या. अनुसूचित जाती कायदा, नागरी हक्क संरक्षण कायद्याची कलमे चव्हाण व इतर आरोपींविरोधात लावण्यात आली आहेत.
पौळकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २७ जानेवारी रोजी शोभा बहारे व इतर पाच जणांनी ‘तुम्हाला आमदार रवींद्र चव्हाण यांनी बोलाविले आहे, असे सांगून रामनगरमधील बालभवन येथे येण्यास सांगितले. तेथे आपण स्वत: भाऊ, वहिनी, बहिणीसोबत गेलो. तेथे आमदार चव्हाण यांनी आधीचआपल्या भावाला शिवीगाळ केली. स्वामी विवेकानंद शाळेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध दाखल केलेली तक्रार मागे घे. नाहीतर तुला जगू देणार नाही, अशी धमकी दिली. या प्रकरणी आपणास संरक्षण देण्यात यावे. तसेच हा गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या रामनगरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पौळकर यांनी केली आहे.

हा बदनामीचा कट
स्वामी विवेकानंद शाळेचे ज्येष्ठ विश्वस्त हे संघाचे कार्यकर्ते आहेत. त्या पदाधिकाऱ्यांवर पौळकर यांनी अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी आपण शाळेच्या बाजूने उभे राहून विश्वस्तांना सहकार्य केले. त्याचा राग फिर्यादीने माझ्यावर अ‍ॅट्रोसिटी करून काढला आहे. विनयभंग वगैरे खोटे आहे. समाजकल्याण खात्याकडून पौळकरसारख्या मंडळींना अ‍ॅट्रॉसिटी व तत्सम गुन्हा दाखल केल्यानंतर पुढील कारवाईसाठी साडेसहा हजार ते एक लाखांपर्यंत रक्कम मिळते. त्यासाठीच पौळकरसारखी मंडळी हे उद्योग करतात.’     रवींद्र चव्हाण

प्रत्यक्ष भेट नाही
रमेश पौळकर यांना आपण प्रत्यक्ष कधीच भेटलेलो नाही. आपल्या विरुद्ध अपहरणाचा एक गुन्हा दाखल करण्यासाठी पौळकर प्रयत्नशील होते. त्यात पोलिसांना तथ्य आढळले नाही. पौळकरांविरुद्ध एका महिलेने तक्रार केली होती. त्याविषयी आपण त्या कुटुंबाला मदत केली. आपल्याविरुद्ध केलेली तक्रार पूर्णत: खोटी आहे.      नंदू जोशी