लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईः मेट्रोच्या आझाद नगर स्थानकाजवळील ओव्हर हेड वायरमध्ये ताडपत्री अडकल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. याप्रकरणी मेट्रो प्रशासनाने अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून या तक्रारीच्या आधारे जवळच्या एका इमारतीच्या कंत्राटदाराविरोधात अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निष्काळजीपणामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेट्रोच्या वर्सोवा – घाटकोपर मार्गिकेवरील आझाद नगर स्थानकाजवळ १८ एप्रिल रोजी ही घटना घडली होता. त्याप्रकरणी मेट्रो-१ चे सुरक्षा अधिकारी श्यामराव बंडगर यांच्या तक्रारीवरून अंधेरी पोलिसांनी मेट्रो रेल्वे कायदा २००२ च्या कलम ७७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, सायंकाळी ६.३० च्या सुमारास बंडगर यांना आझाद नगर मुख्य नियंत्रण कक्षाकडून दूरध्वनी आला होता. आझाद नगर स्थानकावरील फलाट क्रमांक १ जवळील ओव्हर हेड वायरमध्ये ताडपत्री अडकली असून मेट्रोची वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे आझाद नगर स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाल्याचे त्यांना कळवण्यात आले.

आणखी वाचा- मुंबई: आयात केलेल्या ग्लोव्हजचे १०० कंटेनर बंदरांवर अडविले

ओव्हरहेड वायरमधील विद्युतपुरवठा बंद करून त्यावरील ताडपत्री काढण्यात आली. या प्रकारामुळे सायंकाळी ६.१५ ते ६.३० या काळात मेट्रोची वाहतूक बंद ठेवण्यात आली, असे तक्रारीत म्हटले आहे. या ताडपत्रीची पाहणी केली असता त्यावर ओले सिमेंट होते. मेट्रो स्थानकापासून काही अंतरावत एका इमारतीचे बांधकाम सुरू असून तेथून ती ताडपत्री वाऱ्यामुळे उडून आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे बंडगर यांच्या तक्रारीवरून संबंधित इमारीच्या कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.