दुकानात येण्यासाठी मागे लागलेल्या ३ वर्षांच्या मुलाला टाळण्याकरिता त्याच्या मातेनेच लाथ मारल्यामुळे झालेल्या दुखापतीत मुलाचा मृत्यू ओढवल्याची धक्कादायक घटना अँटॉप हिल येथे उघडकीस आली आहे.
ही महिला घटस्फोटित आहे. मुलाचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली तेव्हा आईने मुलाचा मृत्यू आजारपणामुळे झाल्याचा बनाव रचला. घरचेही तिच्या या बनावात सामील झाले होते. तिचा होणार नवरा आणि बहिण यांनीही मुलाच्या मृत्यूची एकच कथा सांगत तब्बल सात दिवस पोलिसांना झुलवत ठेवले. मात्र शवविच्छेदन अहवालातील माहितीच्या आधारे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर अखेर मातेने गुन्हा मान्य केला. गुरुवारी रात्री या मातेला पोलिसांनी अटक केली.
४ ऑगस्टच्या पहाटे आसमाँ शेख (२४ वर्षे) तिच्या ३ वर्षांच्या उमेरला घेऊन शीव रुग्णालयात दाखल झाली. आपला मुलगा झोपल्यानंतर बेशुद्ध पडला आणि तेव्हापासून काहीच हालचाल करत नसल्याचे तिने डॉक्टरांना सांगितले. तपासणीनंतर उमेरचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. मृत्यूविषयी अँटॉप हिल पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी याची नोंद अपघाती मृत्यू करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
पोलिसांच्या चौकशीत आसमाँने सांगितले ते असे.. उमेरला ३ ऑगस्टच्या रात्री ताप होता. तरीही तो बाहेर खेळायला गेला. सायंकाळी ७ वाजता तो खेळून घरी आला. त्यानंतर ९ वाजता केळे खाऊन झोपी गेला. मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास त्याचे अंग थंड पडल्याने त्याला रुग्णालयात घेऊन आले.
अँटॉप हिलच्या जहांगिया मेहफीन खानाजवळ आसमाँ तिच्या दोन मुलांसह राहते. घटस्फोटित आसमाँ मुख्तार नावाच्या एका व्यक्तीशी लग्न करण्याच्या तयारीत होती. गेल्या काही दिवसांपासून घरांमध्ये लग्नाची तयारी सुरु होती. ३ ऑगस्टच्या रात्री मुख्तार आसमाँच्या घरी आला होता. त्यावेळी आसमाँची बहीणही घरी होती. लग्नाच्या नियोजनाची चर्चा केल्यानंतर रात्री आसमाँ जवळच्या दुकानात जाण्यास निघाली. ती परत आली तेव्हा, उमेर झोपला होता. पण रात्री एकाएकी त्याचे अंग थंड पडले, असे तिने पोलिसांना सांगितले.
शवविच्छेदनाच्या अहवालात मात्र, मुलाचा मृत्यू यकृताला झालेल्या जबर दुखापतीमुळे झाल्याचे स्पष्ट होत होते. अशी दुखापत कोणीतरी पोटात जोरात मारल्यानेच होऊ शकते. पोलिसांनी पुन्हा आसमाँची कसून चौकशी सुरू केली. ‘त्या’ सायंकाळी घरी कोण-कोण होते याविषयी माहिती घेतली. उमेर बाहेर खेळायला गेल्यावर त्याला दुखापत झाली असावी, अशी शंका आसमाँने व्यक्त केली. पण, डॉक्टरांनी उमेरला झालेल्या दुखापतीचे स्वरूप पाहता तो पोटात मारल्यानंतर फार फार तर १५ मिनिटे जिवंत राहिला असावा, असे स्पष्ट केले होते.
घटना कशी घडली?
- ३ ऑगस्टच्या रात्री ९ वाजण्याच्या सुमारास आसमाँ दुकानात जाण्यास निघाल्यावर उमेर तिच्या मागे लागला. मलाही दुकानात यायचे असा हट्ट त्याने आईकडे धरला.
- तापाने आजारी असलेल्या उमेरला आई आसमाँने तू आजारी आहेस, नको येऊ मी लगेच परत येते, तू घरातच थांब असे, म्हणत त्याला समजावण्याचा प्रयत्न केला.
- उमेर ऐकायला तयार नव्हता. अखेर, आसमाँच्या रागाचा कडेलोट झाला, तिने उमेरला थोबाडीत मारत त्याचा पाठीत मारले.
- आसमाँ पुन्हा घराबाहेर जाताना दाराजवळ आली असता, उमेर पुन्हा तिच्या मागोमाग जाऊ लागल्याचे पाहून संतापलेल्या आसमाँने त्याच्या पोटात लाथ मारली. उमेर जोरात जाऊन घरात आदळला आणि निपचित पडला.
- त्यानंतर, आसमाँ-मुख्तार यांनी त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, उमेर डोळे उघडत नव्हता. त्याचवेळी तिघांनीही घडलेला सर्व प्रकार कुणालाही न सांगण्याचे ठरवले आणि एकच घटनाक्रम पोलिसांपुढे मांडण्याचे मनाशी पक्के केले.
- शवविच्छेदन अहवाल आणि अँटॉप हिल पोलिसांच्या तपासात आरोपी आईला जेरबंद केलेच.