मुंबईत बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यांत वाढ, दीड लाख गुन्ह्यांपैकी ८३ टक्के आरोपींची मुक्तता तसेच २५ टक्के मुंबईकरांच्या मनात असुरक्षेची भावना..ही धक्कादायक माहिती आहे ‘प्रजा फाऊंडेशन’ या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालातील. गेल्या वर्षभरातील मुंबईतल्या गुन्ह्यांचा अहवाल प्रजा संस्थेने मंगळवारी प्रसिद्ध केला, त्यात या धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
मुंबईत २०११ मध्ये सुनावणीसाठी १ लाख ६१ हजार प्रकरणे आली होती. त्यापैकी ८३ टक्के जणांना दोषमुक्त करण्यात आले आहे. पोलिसांनी केलेला कमकुवत तपासच याला कारणीभूत असल्याचा आरोप प्रजा फाऊंडेशनने केला आहे. २०११ या वर्षांत ३२७५ प्रकरणांचा निकाल देण्यात आला. परंतु पोलिसांना केवळ ३३५ प्रकरणांमध्येच आरोपींना दोषी ठरविता आले. जर केवळ १० टक्के गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा होत असेल, तर पोलिसांचा निष्क्रियपणाचा त्यास कारणीभूत असल्याचा आरोपही संस्थेने केला आहे.
मुंबईतले इतर गुन्हे रोखण्यात पोलिसांना काही प्रमाणात यश आले असले तरी बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली आहे. मुंबईत २०११-१२ या वर्षांत बलात्काराच्या २०७ गुन्ह्यांची नोंद झाली असून त्यात १५ टक्के वाढ झाली आहे. विनयभंगाच्या ५५२ गुन्ह्यांची नोंद झाली असून त्यात १४ टक्के वाढ झाली आहेत. वाहनचोरीच्या घटनाही वाढत असून त्या ११ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. अपुरे पोलीस बळ आणि परिणामी येणाऱ्या तणावामुळे कामावर परिणाम होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मुंबईत पोलिसांच्या मंजूर पदांपैकी १८ टक्के पोलीस बळ कमी असल्याचे संस्थेने म्हटले आहे. तर पोलीस उपनिरीक्षकांच्या तब्बल ६० टक्के जागा कमी असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.    

Story img Loader