करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात लॉकडाउनची घोषणा करण्यात आलेली असून संचारबंदीचा नियम लागू करण्यात आल्यानंतर देखील अनेक नागरिक पहाटे फिरायला निघत असल्यामुळे काशी-मिरा पोलीस ठाण्यात अशा एकुण 19 नागरिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे  मिरा भाईंदर शहरात करोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाटयाने वाढ होत असताना  देखील अनेक नागरिक घराबाहेर पडत असल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिरा भाईंदर शहरात करोना बाधित रुग्णाची संख्या आता 22 वर  पोहचली असून एका 50 वर्षीय  रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे मिरारोड आणि भाईंदरमधील मेडतीया नगर,  नारायण नगर, नया नगर, विनय नगर, एस वी रोड नित्यानंद नगर आणि आर एन ए ब्रॉडवे परिसराला  प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बंद ठेवण्यात आले आहे. परंतु अशा परिस्थितीत देखील अनेक नागरिक हे मॉर्निंग वॉकसाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असल्याचे आढळून आले आहे. अशाचप्रकारे घराबाहेर निघालेल्या एकुण 19 नागरिकांविरोधात काशीमिरा चौक,  हाटकेस  आणि सिल्वर पार्क परिसरातून पोलिसांनी उचलून ‘साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा आणि महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना नियम 2020’  अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांकडून देण्यात आल्यानंतर देखील नागरिक रस्त्यावर आढळून येत असल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime is registered against citizens who are on morning walk msr