रेश्मा आणि प्रवीण सात वर्षे एकत्र रहात होते. पण प्रवीणने दुसऱ्या महिलांशी अनैतिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली व त्याला विरोध केल्याने रेश्माला जीव गमवावा लागला. सीएसटी स्थानकात सुटकेस मध्ये रेश्माच्या मृतदेहाचे गूढ उकलल्यांतर ही माहिती समोर आली आहे.
मूळ अमरावतीच्या असणाऱ्या प्रवीण आणि रेश्माचे प्रेमसंबध होते. घरच्यांनी विरोध केल्याने ते अमरावतीहून आधी नगरला आणि नंतर २००५ मध्ये पुण्याला येऊन स्थायिक झाले. त्यांनी लग्न केले नव्हते परंतु दोघे लिव्ह अ‍ॅण्ड रिलेशनशिपमध्ये एकत्र रहात होते. त्यांना एक मुलगा सुद्धा आहे. दोघांचा संसार सुरळीत सुरू होता. परंतु मागील वर्षांंपासून प्रवीणचे इतर महिलांशी अनैतिक संबंध सुरू झाले होते. त्यामुळे प्रवीण व रेश्मामध्ये भांडणे होत होती. २५ सप्टेंबरला रेश्माने प्रवीणला शेजारच्या मुलीसोबत अश्लिल कृत्य करताना पाहिले होते. त्यावरून दोघांचे जोरदार भांडण झाले आणि त्या भांडणातच प्रवीणने रेश्माला मारहाण करत गळा दाबून तिची हत्या केली. रेश्माचा मृतदेह सुटकेस मध्ये भरून खंडाळा घाटात फेकण्याची त्याची योजना होती. त्याने आपला मित्र अमोल करंजुले (१९) यालाही सोबत घेतले. परंतु सिंहगड एक्सप्रेसमध्ये गर्दी असल्याने ते शक्य झाले नाही. पुढे मुंब्रा खाडीत ही सुटकेस फेकण्याचे ठरले. परंतु तेथेही जमले नसल्याने त्यांनी नाईलाजाने सीएसटी स्थानकात ही सुटकेस ठेवली. तेथून ते बसने दादरला आले व पुण्याला गेले. याप्रकरणी पोलिसांनी अमोल करंजुले यालाही शनिवारी अटक केली. खुनाचा छडा लावण्यासाठी मुंबई – पुणे रेल्वे पोलिसांनी सहा पथके स्थापन केली होती. यासाठी सीसीटीव्ही फुटेजचीही मदत झाली.

Story img Loader