दोन दिवसांपूर्वी एका निळ्या रंगाच्या सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. बॅगमधला मृतदेह पाहूनच पोलिसांनी ही हत्या आहे हे स्पष्ट केलं होतं. मृतदेह मिळाल्यापासून ३६ तासांत या प्रकरणाचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. लिव्ह इन च्या नात्यात वितुष्ट आल्याने प्रियकराने प्रेयसीची हत्या केली आणि तिचा मृतदेह विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने बॅगेत भरला होता. या प्रकरणी आरोपी मनोजला पोलिसांनी ठाण्यातून अटक केली आहे.
पोलिसांनी तपासासाठी तयार केली आठ पथकं
पोलिसांना जेव्हा बॅगेत भरलेला महिलेचा मृतदेह मिळाला तेव्हा पोलिसांनी गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन आठ पथकं तयार केली. या पथकांनी कुर्ला भागातली सगळे सीसीटीव्ही फुटेज तपासले. गुप्त बातमीदारांकडून तरूणीची ओळख पटवण्याचाही प्रयत्न केला, ज्यानंतर पोलिसांना ही तरुणी धारावी या ठिकाणी राहात होती अशी माहिती मिळाली. या मुलीचं नाव प्रतिमा पवल कीसपट्टा असं असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तिचा प्रियकर आणि मारेकरी मनोज याला पोलिसांनी ओदिशा या ठिकाणी पळून जाण्याच्या तयारीत असताना अटक केली. कलम ३०२ च्या अन्वये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज बारला या तरुणाला अटक
या प्रकरणात पोलिसांनी हत्या झालेल्या मुलीच्या प्रियकराला ताब्यात घेतलं आहे. मनोज बारला असं या अटक करण्यात आलेल्या मुलाचं नाव आहे. त्याच्या त्याच्या लिव्ह इनमधल्या प्रेयसीवर संशय होता. त्या संशयातून त्यांच्यात अनेकदा वाद झाले होते.त्यानंतर शनिवारीही त्यांच्यात असाच विकोपाला जाणारा वाद झाला. ज्यावेळी रागाच्या भरात गळा दाबून त्याने तिची हत्या केली. त्यानंतर तो ठाण्याहून ओदिशा या ठिकाणी पळून चालला होता. त्याचवेळी त्याला अटक करण्यात आली.
नेमकी काय घडली घटना?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी पात्री १२ ते १२.३० च्या दरम्यान कुर्ला या भागात एक संशयित बॅग सापडल्याचा फोन पोलिसांना आला. सी. एस.टी. रोड शांतीनगरच्या समोरच्या बाजूला मेट्रो रेल्वेचं काम सुरु आहे. त्याच भागात ही संशयित बॅग आढळली. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन बॅगेची तपासणी केली असता त्यांना त्यात महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतदेह बॅगेत असल्याने या महिलेची हत्या करुन तो त्यात भरण्यात आला हे स्पष्ट आहे असं पोलिसांनी म्हटलं होतं. आता ३६ तासांनी या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.