चिमुरडय़ा मैत्रिणीमुळे मध्य प्रदेशात पालकांकडे सुपूर्द; महिलेला अटक
१२ वर्षांची आकांक्षा.. शिक्षक, शेजारीपाजाऱ्यांना मी इथली नाही, मला इथे पळवून आणण्यात आल्याचे ती सतत सांगायची.. पण कोणीही तिचे म्हणणे गांभीर्याने घेतले नाही. खेळत असताना जिवाभावाची मैत्रीण साक्षीलाही तिने हे सांगितले. साक्षीने तडक आपल्या आईला आकांक्षा असे काही तरी सतत बोलत असल्याचे सांगितले. साक्षीच्या आईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, तिने एका समाजसेविकेच्या मदतीने एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधला आणि अपहरण करून पळवून आणलेल्या आकांक्षाला सहा वर्षांनंतर तिच्या खऱ्या आईच्या कुशीत विसावता आले. नागरिक आणि पोलीस एकत्र आले तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही किती सहज घडू शकतात याचे मूर्तिमंत उदाहरण अंधेरीत उजेडात आले आहे.
१३ मे रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र वाघ यांना राखी शर्मा या समाजसेविका महिलेचा फोन आला. दुर्गा नगरमध्ये एक महिला १२ वर्षांच्या मुलीला घेऊन राहात असून ती त्यांची खरी मुलगी नसल्याचे सांगितले. वाघ यांनी ही गोष्ट वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासलवार यांना सांगितली. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यास वाघ यांना सांगितले. वाघ यांनी शर्मा यांनी सांगितलेल्या घरी जाऊन चौकशी केली असता आरती सोनावणे (२७वर्षे) या तरुणीजवळ १२ वर्षांची आकांक्षा (नाव बदलले आहे) असल्याचे आढळले. सखोल चौकशी केली असता, आकांक्षाला आपल्या आईने सांभाळण्यासाठी आपल्याकडे दिल्याचे आरतीने सांगितले. आरती बारबाला असल्याने पोलिसांना तिच्या बोलण्याची शंका येऊ लागली. त्यांनी आरतीच्या आईला चौकशीसाठी बोलावले. दोघांचीही १६ ते १८ मे दरम्यान चौकशी करण्यात आली. त्यावेळी आकांक्षा कमला नावाच्या महिलेची मुलगी असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. कमला पोलीस ठाण्यात आली आणि तिने आपण मध्य प्रदेशातील असून आकांक्षा माझीच मुलगी असल्याचे सांगितले. परंतु, एमआयडीसी पोलिसांचे समाधान होत नव्हते. लहानग्या आकांक्षाची चौकशी केली असता, मी सतनाला राहते, माझ्या आईचे बांगडय़ांचे दुकान असून दुकानाजवळ खेळत असताना मला अंकल-आंटीने उचलून नेले इतकेच सांगितले. राहत्या जागेच्या काही खुणा आठवतायत का, असे विचारले असता, बसथांबा, बांगडय़ांचे दुकान आणि एक विहीर जवळपास असल्याचे तिने सांगितले. साहाय्यक निरीक्षक वाघ यांनी मध्य प्रदेश पोलिसांशी संपर्क साधून अशा तीन खुणा एकत्रित कुठे आहेत, याचा शोध सुरू केला. चौकशीनंतर तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बसथांबा, विहीर, बांगडय़ाचे दुकान आसपास असल्याचे कळाले. अखेर कोलगवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आकांक्षा राहात असल्याचे कळाले. तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक इंद्रेश त्रिपाठी यांनी सहा वर्षांपूर्वी येथील दाम्पत्याने आपली सहा वर्षांची मुलगी हरविल्याची तक्रार केल्याचे वाघ यांना कळविले. ही माहिती मिळताच, त्यांच्या तपासाला वेग आला. मग आई असल्याचा दावा करत असलेल्या कमलाची उलटतपासणी केली असता, तिनेच आकांक्षाला पळवून आणल्याचे कबूल केले. कमलाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केले. साहाय्यक निरीक्षक वाघ यांच्यासह पथक मध्य प्रदेशात रवाना झाले. रविवारी त्यांनी आकांक्षाला तिच्या आईवडिलांकडे सुपूर्द केले. आमच्या अधिकाऱ्यांच्या जागरूकतेमुळे एका चिमुरडीला तिचे घर-पालक पुन्हा मिळाले, याचे आम्हाला समाधान आहे, असे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पासलवार यांनी सांगितले.
तक्रार नको म्हणून शाळेत घातले
माझ्या सर्व मैत्रिणी शाळेत जातात मग मला का शाळेत पाठवीत नाही, असे आकांक्षा आरतीला विचारत असे. कुणी जास्त चौकशी करू नये यासाठी तिने आकांक्षाला शाळेत घातले. तिथे अनेकदा तिने आपण इथले नसल्याचे शिक्षकांना सांगितले. मात्र, शिक्षकांनी ते हसण्यावारी नेले. अखेर साक्षी नावाच्या मैत्रिणीला तिने सांगितले तेव्हा साक्षीने आई ममता सोनी हिला ही गोष्ट सांगितली. ममता यांनी राखी शर्मा यांना हा प्रकार सांगितल्यावर मुलीची सुटका झाली.
अपहृत मुलीला सहा वर्षांनंतर मायेची ऊब..
चिमुरडय़ा मैत्रिणीमुळे मध्य प्रदेशात पालकांकडे सुपूर्द; महिलेला अटक
Written by अनुराग कांबळे
Updated:
First published on: 23-05-2016 at 00:16 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Criminal woman arrested by mumbai police