संघटित गुन्हेगारी टोळ्यांकडून खंडणीचे दूरध्वनी कमी झाल्याचा दावा केला जात असला तरी काही जुन्या टोळ्या नव्या क्लृप्त्या काढून खंडणीखोरी करीत असल्याचे उघडकीस आले आहे. फारशा परिचित नसलेल्या सुरेश पुजारी टोळीने दहशत पसरविण्यासाठी यूटय़ूबचा वापर केला. उल्हासनगरमधील गोळीबार आपणच केला असा दावा करीत त्याची क्लिप यूटय़ूबवर कुठल्या फाइलनेमने आहे, हे खंडणीसाठी धमकावताना सांगण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी कक्षाने या टोळीच्या गुन्ह्य़ाची पद्धत शोधून शिताफीने या टोळीतील प्रकाश बिछल, मुबश्शीर सय्यद, गौतम ऊर्फ डॅनी विनोद मेहता, छोटेलाल जैस्वाल, कृष्णा खंडागळे, संतोष गायकवाड, नरेश शेट्टी, रवी गायकवाड यांना अटक केली. त्यांच्याकडून नऊ एमएमचे पिस्तूल, दोन मॅगझिन्स, सात जिवंत काडतुसे आदी हस्तगत करण्यात आले.
मुंबई आणि ठाण्यातील विकासक, व्यावसायिक आदींवर पाळत ठेवून पद्धतशीररीत्या त्याची माहिती सुरेश पुजारीकडे पोहोचविली जात होती. त्यानंतर सुरेश पुजारीकडून दूरध्वनी येत होते. इतकेच नव्हे तर काही ठिकाणी गोळीबार घडवून आणणे आणि त्यासाठी गुंडांची व्यवस्था केली जात होती. मुंबईतील प्रसिद्ध व्यावसायिकाला पाच कोटींच्या खंडणीसाठी सतत दूरध्वनी येत होते. इतकेच नव्हे तर यूटय़ूबवरील अमुक अमुक चित्रफीत पाहा आणि तो गोळीबार आम्हीच केला. आताही त्याचीच पुनरावृत्ती करू, असे सतत धमकावले जात होते. सहआयुक्त (गुन्हे) अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी कक्षाचे विनायक वत्स तसेच विनायक मेहेर, सचिन कदम, संजीव धुमाळ आदींनी मेहनत घेऊन या प्रत्येक संशयिताची माहिती घेऊन नंतर त्यांना अटक केली. थेट पुरावा नसतानाही योजनाबद्ध रीतीने या सर्वाच्या हालचालींवर पाळत ठेवण्यात आली होती. दूरध्वनीवरील संभाषण आदींची माहिती घेतल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे सहआयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले. मुंबई आणि ठाण्यातील अनेकांना त्यांनी कोटय़वधी रुपयांच्या खंडणीसाठी लक्ष्य केले होते, असे वरिष्ठ निरीक्षक विनायक वत्स यांनी सांगितले.