प्रसाद रावकर
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबापुरीला नागरी सुविधा पुरविणाऱ्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक नेमकी कधी होणार याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. दिवाळीनंतर निवडणुकीचे बिगूल वाजेल आणि रण पेटेल अशी चर्चा राजकीय नेते, इच्छुक आणि कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागली आहे.
गेल्या आठवडय़ात मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग आरक्षणाची सोडत पार पडली आणि चर्चेला उधाण आले. इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या आरक्षणासह लवकरच पुन्हा एकदा सोडत काढली जाईल असा तर्कही लढविला जात आहे, असो. मात्र तूर्तास उमेदवारी मिळणारच या अपेक्षेने अनेकांनी गुढघ्याला बाशिंग बांधायला सुरुवातही केली आहे. तर काही मंडळी इतरांचे पत्ते कापून उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. एकूण प्रतिस्पध्र्याशी लढताना प्रत्येक राजकीय पक्षाला बरीच ताकद पणाला लावावी लागणार आहे. त्यातच उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या लक्षात घेता बंडाळी माजू नये याची काळजी घेताना पक्षांची दमछाक होणार असेच दिसत आहे.

मुंबई महानगरपालिकेची मागील म्हणजे २०१७ मध्ये २२७ प्रभागांमध्ये निवडणूक पार पडली होती. गेल्या पाच वर्षांमध्ये पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक सत्ताधाऱ्यांच्या पंखाखाली आले. परिणामी, मुंबई महानगरपालिका सभागृहाचा कार्यकाळ संपुष्टात आला त्यावेळी तीन अपक्ष, मनसेशी काडीमोड घेऊन आलेल्या सहा नगरसेवकांसह शिवसेनेचे संख्याबळ ९७ वर पोहोचले. तर एक अपक्ष आणि अखिल भारतीय सेनेच्या एक नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे भाजपचे संख्याबळ ८१ वर पोहोचले होते. तर काँग्रेस २९, राष्ट्रवादी काँग्रेस आठ, समाजवादी पार्टी सहा, मनसे एक आणि एमआयएम दोन असे संख्याबळ पालिकेत होते. दोन नगरसेवकांचे निधन झाल्याने आणि एक नगरसेवक अपात्र ठरल्याने या जागा रिक्तच होत्या.

प्रभाग सोडतीची तारीख जाहीर होताच अनेकांचे डोळे त्याकडे लागले होते. मुंबईमधील प्रभाग संख्या नऊने वाढविण्यात आल्याने एकूण २३६ प्रभागांसाठी सोडत काढण्यात आली. या निवडणुकीत ५० टक्के प्रभाग महिलांसाठी आरक्षित करण्यात आले. सोडतीनुसार २३६ पैकी ११० प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले, म्हणजेच खुले झाले. या प्रभागांमधून कोणत्याही जाती, धर्माचा पुरुष वा महिलेला निवडणूक लढविण्याची संधी मिळणार आहे. तर १०९ प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाले आहे. त्याचबरोबर अनुसूचित जातींतील महिलांसाठी आठ, तर अनुसूचित जमातीतील महिलांसाठी एक प्रभाग आरक्षित झाला आहे. त्याव्यतिरिक्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी अनुक्रमे सात आणि एक प्रभाग आरक्षित असून या प्रभागांतून पुरुषांबरोबरच महिलांनाही संधी मिळू शकते.

प्रभागांतील आरक्षणाची सोडत काढण्यात येत असताना अनेकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. आपल्या आणि लगतच्या प्रभागांवर कोणते आरक्षण येणार याकडे माजी नगरसेवक आणि इच्छुक मंडळी डोळे लावून बसले होते. अखेर सोडत पूर्ण झाली आणि काहींनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मागील निवडणुकीत विजयी झालेल्या काही नगरसेविकांचे प्रभाग खुले झाले. मागील निवडणुकीत महिलांसाठी आरक्षित झालेल्या प्रभागांमधून निवडणूक लढविण्याची संधी हुकल्याने अनेकाच्या आनंदावर विरजण पडले होते. परंतु आता हेच प्रभाग खुले झाल्याने उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक पुरुष मंडळी व्यूहरचना करू लागली आहेत. परंतु मागील निवडणुकीत या प्रभागांमधून विजयी झालेल्या नगरसेविकांचे कडवे आव्हान त्यांना पेलावे लागणार हेही तितकेच खरे. माजी नगरसेविकही यावेळी खुल्या झालेल्या प्रभागांतून निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने कामाला लागल्या आहेत.
आता नेमकी उमेदवारी कोणाला द्यावी असे धर्मसंकट राजकीय पक्षांसमोर उभे राहणार आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये विविध मुद्दय़ांवरून सभागृह गाजविणाऱ्या काही माजी नगरसेवकांचे प्रभाग सोडतीमध्ये महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. आपल्या हक्काच्या प्रभागातून निवडणूक लढविण्याची संधी हुकल्यामुळे अनेक माजी नगरसेवक चिंतेत आहेत.

असेही गेल्या पाच वर्षांमध्ये या मंडळींनी लगतच्या प्रभागांमध्ये मतांची बेगमी करण्यास सुरुवात केली होती. नगरसेवक निधीमधून केवळ आपल्याच नव्हे, तर लगतच्या दोन-तीन प्रभागांमधील नागरी कामे करून मतदारांची मने जिंकण्याचे प्रयत्न केले होते. हे प्रयत्न आता कामी येण्याची वेळ आली आहे. परंतु मागील निवडणुकीमध्ये त्या प्रभागांमधून विजयी झालेल्यांचे कडवे आव्हान या मंडळींना पेलावे लागणार आहे. त्यातूनही पक्षाने उमेदवारी दिलीच तर निवडणुकीच्या प्रचारापासून मतदानापर्यंतच्या काळात तेथील कार्यकर्ते आणि उमेदवारी न मिळालेल्यांना जपावे लागणार आहे. हे जमले नाही तर पराभवाची धूळही चाखावी लागणार याची पक्की खात्री या मंडळींना आहे. इतका सर्व खटाटोप करण्याऐवजी पक्षाने महिलांसाठी आरक्षित झालेल्या आपल्या प्रभागातून पत्नी अथवा मुलीला उमेदवारी दिली तर आलबेल होईल असा विचार करून काही मंडळी कामाला लागली आहेत. मात्र, प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्याने तेथील कार्यकर्त्यां आक्रमक होऊन उमेदवारी मागू शकतात. वर्षांनुवर्षे आम्ही खांद्यावर पक्षाचे झेंडेच वागवायचे का, आम्हालाही निवडणूक लढविण्याची संधी द्यावी असे म्हणून उमेदवारीवर दावा करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या सर्वच पक्षात मोठी आहे.

विविध राजकीय पक्षांतील नेते मंडळी आपल्या मुलाबाळांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. गेली पाच वर्षे कार्यकर्त्यांवर मदार असलेल्या या मंडळींना अचानक आपल्या मुलाबाळांचा उमाळा आला आहे. परंतु असे असले तरी आता कार्यकर्तेही सुज्ञ झाले आहेत. गेली पाच वर्षे ज्याच्या आधिपत्याखाली कामे केले, तोच नेता आपल्याला आता वाऱ्यावर सोडू लागला आहे. त्यामुळे या कार्यकर्त्यांनी पक्षातील अन्य मातब्बर नेत्यांची मनधरणी करण्यास सुरू केली आहे. एकूणच परिस्थिती लक्षात घेता सर्वच पक्षांमध्ये हळूहळू नाराजीची पट्टी वाढण्याची चिन्हे आहेत.
सध्या मुंबईत शिवसेना आणि भाजपवगळता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टीचा जोर तसा कमी आहे. राजकीय घडामोडींमुळे मनसेबाबत आताच काही सांगता येत नाही. तरीही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, मनसेमधील उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांची संख्या प्रचंड आहे. शिवसेनेमध्ये तर एकेका प्रभागांतून पाच-सहा मंडळी निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. भाजपमध्येही परिस्थिती काहीशी अशीच आहे. त्यामुळे भविष्यात उमेदवारी मिळविण्यावरून मुंबईत बरेच काही घडू शकते.

उमेदवारी न मिळालेली मंडळी बंडखोरी करू शकतात. बंडखोरी करू न शकणारे पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या पराभवासाठी छुपा कार्यक्रम राबवू शकतात. आगामी निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्षांना अशा एक ना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. आताच कुठे प्रभागांची सोडत पार पडली आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर व्हायच्या आहेत. तत्पूर्वीच कार्यकर्ते बाह्य सरसावून उमेदवारी मिळविण्यासाठी सज्ज होऊ लागले आहेत. परिणामी, राजकीय पक्षांसमोर मोठे धर्मसंकट उभे राहण्याची चिन्हे आहेत. मात्र निवडणुकीचे रण पेटण्यापूर्वीच रंगणाऱ्या राजकीय नाटय़ामुळे मुंबईकरांचे मनोरंजन होणार इतकेच.
prasadraokar@gmail. com

Story img Loader