संजय बापट
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशातील साखर टंचाईचे संकट टाळण्यासाठी साखर कारखान्यांमध्ये उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवर निर्बंध घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे साखर उद्योगाला सुमारे तीन हजार कोटींचा फटका बसला आहे. आजमितीस देशभरात इथेनॉल निर्मितीसाठीच्या ‘बी- हेवी मोलाईसेस’चा सुमारे साडे पाच लाख लिटर मेट्रिक टनाचा साठा शिल्लक असून वेळीच त्याचे इथेनॉलमध्ये रूपांतर केले नाही तर हा साठा वाया जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इथेनॉल निर्मितीवरील निर्बंधांमुळे पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचे धोरणही संकटात आले आहे. त्यामुळे उसापासून इथेनॉल निर्मितीवरील बंदीचा तातडीने फेरविचार करण्याची मागणी राज्य सहकारी साखर कारखाना संघाने केंद्राकडे केली आहे.

हेही वाचा >>>डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी रेल्वे मेगाब्लॉक, प्रवाशांचे होणार हाल

यंदाच्या गळीत हंगामात साखर उत्पादनातील संभाव्य घट आणि साखरेची टंचाई याचा याचा विचार करून केंद्र सरकारने ७ डिसेंबर रोजी एका आदेशान्वये उसाचा रस आणि ‘बी- हेवी मोलाईसेस’ (रस)पासून इथेनॉल उत्पादन करण्यावर बंदी घातली आहे. केंद्राने ही बंदी लागू केली त्यावेळी देशभरात सुमारे साडपाच लाख लिटर मेट्रिक टन रसाचा साठा शिल्लक होता. एकटय़ा महाराष्ट्रात उसाचा रस, मोलाईसेसचा सुमारे एक हजार कोटी किमतीचा हा साठा गेल्या काही महिन्यांपासून शिल्लक आहे. त्याचे वेळीच इथेनॉलमध्ये रूपांतर केले नाही तर तो वाया जाणार आहे.

दुसरीकडे, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्याकडेही देशभरातील साखर कारखान्यांनी आपली कैफियत मांडल्यानंतर त्यांनीही याबाबत थेट सहकारमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून इथेनॉल निर्मितीवर घालण्यात आलेली बंदी उठविण्याची मागणी केली आहे. शिल्लक असलेल्या साठय़ातून सुमारे २८५० कोटींची इथेनॉलनिर्मिती होऊ शकेल. या बंदीमुळे साखर उद्योग अडचणीत आला असून केंद्राने त्वरित आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंतीही त्यांनी केल्याचे समजते.

हेही वाचा >>>घराचा ताबा विलंबाने मिळाल्यास खरेदीदार व्याजासाठी पात्र, उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे खरेदीदारांना दिलासा

लवकरच गोड बातमी?  

इथेनॉलनिर्मितीवरील बंदीबाबत हर्षवर्धन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘बंदीमुळे साखर उद्योगासमोर उभ्या राहिलेल्या संकटाबाबत आपण सहकारमंत्री अमित शहा यांना पत्राद्वारे माहिती दिली आहे. कारखान्यांची अडचण केंद्राच्या लक्षात आली असून त्यातून मार्ग काढण्याचा सकारात्नक प्रयत्न सुरू आहे. त्याबाबत लवकरच गोड बातमी मिळेल.’’

खळीचा साठा स्फोटक : राज्यात उसाचा रस, मोलाईसेसचा सुमारे एक हजार कोटींचा साठा ज्वलनशील असल्याने त्याचा स्फोट होऊन आग लागण्याचाही मोठा धोका आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा साठा पडून असल्याने त्यांची उपयुक्तता संपण्यापूर्वी इथेनॉलनिर्मितीस परवानगी देण्याची विनंती राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crisis on sugar industry 3000 crore hit due to restrictions on ethanol production amy