मुंबई : ‘खासगी रुग्णालयातील रुग्णांना दाखल करून घ्यायचे नाही’ अशी आडमुठी भूमिका घेत शीव रुग्णालयातील ट्रॉमा केअरमधील डॉक्टरने सोलापूरहून गंभीर अवस्थेत आणलेल्या ८७ वर्षीय रुग्णाला दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे तब्बल २४ तास स्ट्रेचरवरच असलेला रुग्ण उपचाराची वाट पाहत होता. उपचारासाठी नातेवाईक विनवण्या करीत होते, मात्र डॉक्टराला पाझर फुटला नाही. अखेर रुग्णालयाचे अधिष्ठाता मोहन जोशी आणि खासदार संजय पाटील यांच्या सूचनेनंतर रुग्णाला दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यानंतरही रुग्णाला दुसऱ्या दिवशी रुग्णकक्षामध्ये दाखल करून उपचार सुरू करण्यात आले.
सोलापूर येथील माळशिरस तालुक्यात राहणारे बाळू कटके (८७) यांचा ११ फेब्रुवारी रोजी अपघात झाला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अतिदक्षता विभागात २३ दिवस उपचार घेतल्यानंतरही प्रकृतीत सुधारणा नसल्याने मुंबई महानगरपालिकेमध्ये कामाला असलेल्या त्यांचा मुलगा विष्णू कटके यांनी त्यांना शीव रुग्णालयात आणण्याचा निर्णय घेतला. ७ मार्च रोजी बाळू कटके यांना मोबाइल व्हॅनमधून सहा तास प्रवास करून सकाळी ११ वाजता शीव रुग्णालयात आणले. त्यावेळी आपत्कालिन विभागामध्ये कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरने त्यांना आतमध्ये घेण्यास नकार दिला. तसेच ट्रॉमा केअर विभागातील डॉक्टरनेही खासगी रुग्णालयातील रुग्णांना दाखल करून घ्यायचे नाही, असे वरिष्ठांचा आदेश असल्याचे सांगत कटके यांना दाखल करून घेण्यास नकार दिला. त्याचबरोबर रुग्ण ८७ वर्षांचे असून, त्यांची वाचण्याची काहीच शाश्वती नाही. तुम्हाला माझी कुठे तक्रार करायची तर करा, मला काहीच फरक पडत नसल्याचे त्या डॉक्टरने उद्धटपणे रुग्णांच्या नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर शस्त्रक्रिया विभागाच्या डॉक्टरने सुद्धा हीच भूमिका घेतली. या वादात सहा तास निघून गेले.
रुग्णाला दाखल करून घेण्यासाठी बाळू कटके यांचा मुलगा विष्णू कटके डॉक्टरांना विनवणी करत होते. मात्र त्यांना पाझर फुटला नाही. विष्णू कटके हे मुंबई महानगरपालिकेतील कर्मचारी असल्याने त्यांनी ओळखीच्या अनेकांना मदतीसाठी फोन केला. अखेर त्यांनी खासदार संजय पाटील व शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांची भेट घेतली. त्यावर ट्रॉमा विभागातील संबंधित डॉक्टरने अधिष्ठात्यांनी रुग्णाला दाखल करण्यासंदर्भात लेखी दिले तरच दाखल करून असे सांगितले. यावर अधिष्ठात्यांनी दाखल करून घेण्याबाबत लेखी देण्याची तयारी दाखवल्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता बाळू कटके यांना रुग्णालयात दाखल करून घेण्याची तयारी दर्शवली. मात्र त्यानंतर वेळकाढूपणा करण्यासाठी रुग्णाचे केसपेपर वारंवार तपासले जात होते. वरिष्ठ डॉक्टरांना पाठविले जात होते. मात्र रुग्णाला रुग्णालयात दाखल करून घेण्याऐवजी स्ट्रेचरवरच ठेवले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता कटके यांना रुग्णकक्ष ४१ मध्ये दाखल करण्यात आले. तोपर्यंत तब्बल २४ तास रुग्ण स्ट्रेचरवरच होते. ट्रॉमा केअरमधील डॉक्टरने हे जाणीवपूर्वक केल्याचा आरोप कटके यांच्या नातेवाईकांनी केला. रुग्णालयातील डॉक्टरकडून त्यांच्या उपचाराकडे दुर्लक्ष केले जात असून, बाबांची प्रकृती गंभीर झाल्याने १० मार्च रोजी दुपारी त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आल्याचे विष्णू कटके यांनी सांगितले.
उद्धट डॉक्टरांमुळे मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांची प्रतिमा खराब होते. डॉक्टरांच्या आठमुठ्या भूमिकेमुळे रुग्णाच्या जीवावर बेतण्याची शक्यता होती. त्यामुळे या डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी.- विष्णू कटके
जीव वाचवणारे डॉक्टर अशी भूमिका घेत असतील तर ते योग्य नाही. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांवर विश्वास असल्यानेच लोक उपचारासाठी येत आहेत. मात्र डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्यास नकार देणे हे योग्य नाही. डॉक्टरांच्या आठमुठ्या भूमिकेमुळे रुग्णाचा जीव जाऊ शकला असता. या प्रकरणी पालिका आयुक्त भुषण गगराणी यांनी कठोर कारवाई करावी.- संजय पाटील, खासदार, ईशान्य मुंबई
खासगी रुग्णालयातील रुग्णांना घेऊ नये असे कोणतेही आदेश दिलेले नाहीत. संबंधित रुग्णावर उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नव्हते. तसेच रुग्णालयामध्ये जागा उपलब्ध नसल्याने हा वाद झाला. मात्र रुग्णावर सध्या योग्य उपचार सुरू आहेत.- डॉ. मोहन जोशी, अधिष्ठाता, शीव रुग्णालय