मुंबई : गेल्या दशकभरात राज्याची आर्थिक आघाडीवर पीछेहाट झाल्याच्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने काढलेल्या निष्कर्षावरून निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. हा निष्कर्ष अत्यंत गंभीर असल्याची टीका राष्ट्रवादीचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी केला असतानाच, भाजपचे आशिष शेलार आणि शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी या पीछेहाटीस महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा पलटवार केला.
राज्याच्या स्थापनेपासून २०२३-२४ या आर्थिक वर्षापर्यंत देशातील सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्राने आर्थिक क्षेत्रात आघाडी घेतली होती. मात्र आर्थिक आघाडीवर दशकभरात राज्याची पीछेहाट झाल्याचा निष्कर्ष पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने काढल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ मध्ये प्रसिद्ध होताच त्याचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली. त्याच वेळी शिवसेनेचे (शिंदे) खासदार नरेश म्हस्के, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाराष्ट्राची पीछेहाट होण्यास उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला.
हेही वाचा >>>नवाब मलिक यांच्या जावयाचे निधन; काही दिवसांपूर्वी झाला होता गंभीर अपघात, निवडणूक काळात कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्राला पाठीमागे टाकून गुजरात राज्याला आर्थिक विकासात पुढे नेण्यावर मोदी सरकारचा भर दिसतो, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसने लगावला. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून राज्य सर्व क्षेत्रांमध्ये पहिल्या क्रमांकावर होते. गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्राची सर्व क्षेत्रांमध्ये पीछेहाट झाल्याचा निष्कर्ष पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने काढला आहे, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची पीछेहाट झाली हे तर सध्याच्या महायुती सरकारचे मोठे अपयश असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. महाराष्ट्र सर्व क्षेत्रांमध्ये आघाडीवर असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने करीत असताना या अहवालातून दावा फोल ठरल्याचे स्पष्ट होते, असेही पटोले म्हणाले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा १५.२ टक्के होता. तोच वाटा महायुती सरकारच्या काळात १३.३ टक्क्यांपर्यंत घटल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. महायुती सरकारने महाराष्ट्राची वाट लावली हे या अहवालावरून स्पष्ट होते, अशी टीका राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी केली.
हेही वाचा >>>गोरेगाव येथील इमारतीला भीषण आग; दिवाळीत मुंबईत आगीचे सत्र सुरुच
या टीकेला प्रत्युत्तर देताना शिवसेना, भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडीलाच जबाबदार ठरविले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सकल राज्य उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा हा १३ टक्क्यांपर्यंत घटला होता. महायुती सरकारच्या काळात हाच वाटा १३.३ टक्के झाल्याचा दावा शेलार यांनी केला. नरेश म्हस्के म्हणाले, की पंतप्रधानांच्या सल्लागार परिषदेने राज्याबद्दल कोणतेही नकारात्मक मत व्यक्त केलेले नाही. राज्याची पीछेहाट झाली तेव्हा २०२०-२१ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत होते. याउलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारच्या काळात प्रगती झाल्याचा दावा म्हस्के यांनी केला.
राज्याच्या प्रगतीची चढती कमान ही महायुतीचे सरकार आल्यानंतरच्या काळातच सुरू झाली. महाविकास आघाडीचे पाप आमच्या माथी मारू नका. – आशिष शेलार, अध्यक्ष, मुंबई भाजप
पंतप्रधानांना सल्ला देणाऱ्या विभागाचा राज्याबाबत निष्कर्ष अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी पावले टाकण्याकडे पंतप्रधान आणि त्यांचे सर्व सहकारी दुर्लक्ष करीत आहेत. निव्वळ राजकारणाने प्रश्न सुटत नसतात, याची नोंद सत्ताधाऱ्यांनी घेतलेली दिसत नाही. – शरद पवार, नेते, राष्ट्रवादी (शरद पवार)