लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: पालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा मार्गावर डांबरी आवरणाचे पट्टे दिसत असून कोट्यावधीच्या या मार्गावर खड्डे पडल्याची चर्चा समाजमाध्यमावर सुरु आहे. या डांबरी उंचवट्यामुळे नवाकोरा सागरी किनारा मार्ग वाहनचालकांसाठी त्रासाचा ठरू लागला आहे. मुंबई महापालिकेने मात्र हे आरोप फेटाळले आहेत.
धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प हा पालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून कोट्यावधी रुपये या प्रकल्पासाठी खर्च करण्यात आले आहेत. मरीन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी सागरी सेतूपर्यंत हा मार्ग तयार केला जात आहे. या प्रकल्पांतर्गत आतापर्यंत टप्प्याटप्याने मार्गिकांचे लोकार्पण करण्यात आले आहे. मात्र या मार्गावर महालक्ष्मी ते वरळी या भागात मोठ्या प्रमाणात डांबराचे उंचवटे दिसत असून त्यामुळे वाहनचालकांना त्रास सोसावा लागत आहे. काही वाहनचालकांनी समाजमाध्यमावर याबाबतची छायाचित्रे आणि ध्वनीचित्रफिती प्रसारित केल्या आहेत. सागरी किनारा मार्गावर खड्डे पडले असून खड्डे भरणी अतिशय वाईट पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप या मजकूरातून करण्यात आला आहे. त्यावर मुंबईकरांनी प्रतिक्रियेतून पालिकेवर टीका केली आहे. प्रकल्पाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
हेही वाचा >>>मेहुणीच्या खुनाचा आरोप; खटल्याविना आठ वर्षे कारागृहात असलेल्या आरोपीची जामिनावर सुटका
दरम्यान, पालिका प्रशासनाने हे आरोप फेटाळले आहेत. सागरी किनारा मार्ग पूर्णपणे सुरक्षित असून या रस्त्यावर तडे वगैरे नाहीत. तसेच, रस्त्यांवर खड्डेही झालेले नाहीत. चित्रफितींमध्ये किनारी रस्त्यावर दिसणारे पट्टे (पॅचेस) हे खड्डे प्रतिबंधक उपाययोजना म्हणून टाकलेल्या मास्टिकच्या आवरणाचे आहेत. पावसाळ्यानंतर या मार्गांचे स्वरुप पूर्ववत करण्यात येईल, असे मुंबई महानगरपालिका प्रशासनाने म्हटले आहे.
मुंबई किनारी रस्ता अंतर्गत उत्तर दिशेने जाणारा मार्ग (चौपाटी ते वरळी) हा जुलै २०२४ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यापूर्वी त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. पावसाळ्यात झालेल्या सततच्या व जोरदार पावसामुळे डांबरीकरणाचे नुकसान होवू नये, रस्त्यांवर खड्डे होवू नयेत यासाठी त्यावर मास्टिकचे अतिरिक्त आवरण ठिकठिकाणी टाकण्यात आले आहे. वरळी ते चौपाटी या दक्षिणवाहिनी मार्गावर मास्टिकचे आवरण टाकलेले नाही, असाही युक्तीवाद प्रशासनाने केला आहे. दक्षिणवाहिनी मार्ग मार्च २०२४ मध्ये खुला करण्यात आला. त्यावरील डांबरीकरण पावसाळ्यापूर्वी मजबूत होण्यास पुरेसा अवधी मिळाला. रस्ते बांधणीत कोणताही दोष नाही, असेही प्रशासनाने म्हटले आहे.
हेही वाचा >>>तोतया पोलीस अधिकाऱ्यांनी अटकेची भीती दाखवून लुटले; खारमध्ये गुन्हा दाखल
तात्पुरत्या उंचवटे?
सागरी सेतूवरील वाहतूक सुरळीत राहावी म्हणून पर्यायी मार्ग तयार करण्यात आला आहे. वरळी आंतरमार्गिकेच्या ठिकाणी, वरळीतील खान अब्दुल गफार खान मार्गावर जाण्यासाठी तात्पुरता रस्ता तयार करुन हा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. किनारी रस्त्यावरुन थेट सागरी सेतुवर प्रवेश खुला झाल्यानंतर या तात्पुरत्या रस्त्याची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे तात्पुरती व्यवस्था असलेल्या या मार्गाची मुख्य प्रकल्पाच्या बांधकामाच्या दर्जाशी कृपया तुलना करु नये, असेही प्रशासनाने म्हटले आहे.