लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई-नाशिक महामार्गाच्या दुरवस्थेवरून विरोधकांनी गुरुवारी सरकारला धारेवर धरले. गेल्या पावसाळी अधिवेशनात मार्चपूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करण्याची ग्वाही सरकारने विधिमंडळात दिली होती. मात्र या आश्वासनाचा सरकारला विसर पडला असून या महामार्गाची अवस्था पूर्वीपेक्षा दयनीय असून प्रवाशांना आठ तासांपेक्षा अधिक वेळ लागत आहेत, असे सांगत काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारच्या नाकर्तेपणावर नाराजी व्यक्त केली.

विधानसभेत थोरात यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे मुंबई-नाशिक महामार्गाच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित केला. पूर्वी या रस्त्याने मुंबईला येण्यासाठी तीन तासांचा कालावधी लागत होता. आता तो सहा ते आठ तासांवर गेला आहे. मागील वर्षी पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. त्यावेळेस काही झाले तरी ३१ मार्चपर्यंत या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची ग्वाही देण्यात आली होती. मात्र दुर्दैवाने आज या रस्त्याची अवस्था पूर्वीपेक्षा भयानक असून त्याकडे कोणाचचे लक्ष नसल्याचे थोरात यांनी सांगितले.

हेही वाचा >>>राज्यातील २२ केंद्रांवर ७ जुलै रोजी लेखी परीक्षा

खड्ड्यांचे जाळे’

या महामार्गावर खड्ड्यांचे जाळे पसरले असून वाहनांच्या लांब रांगांचा सामना करावा लागतो. त्यासाठी पर्यायी व्यवस्थाही केली जात नाही. त्यामुळे येणाऱ्या- जाणाऱ्या नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे, हा प्रश्न गंभीर आहे. तातडीने याच्यावर उपाययोजना करून मार्ग काढून वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवावा लागेल, अशी मागणीही त्यांनी केली. थोरात यांच्या या मागणीला नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही सहमती दर्शविली.