मुंबई : आयआयटी मुंबईच्या पवई येथील परिसरात मगर मुक्तसंचार करताना आढळून आली आहे. रविवारी रात्री साधारण सहा फूट लांबीची मगर येथील रहिवाशांना वावरताना दिसली. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी मगरीचे छायाचित्र घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असल्याने आयआयटी मुंबईच्या पवई येथील परिसरामध्ये बिबट्याचे दर्शन घडणे हे आता नवीन नाही. याचबरोबर पवई तालावाला लागूनच हा परिसर असल्याने मागील काही वर्षांत पवईच्या रस्त्यांवर आता मगरीही मुक्तसंचार करु लागल्या आहेत. रविवारी रात्रीच्या सुमारास लेक साईट परिसरातील पद्मावती मंदिर येथे एक मगर रस्त्यावर फिरत असल्याचे आढळून आले. मगर रस्त्यावर फिरत असल्याचे पाहून नागरिकांनी सुरक्षा रक्षकांना याबाबत माहिती दिली. दरम्यान, काही वेळाने मगर पुन्हा तलावात निघून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

पवई तलावात मगरींचे अस्तित्व

पवई तलावात मोठ्या प्रमाणात मगरींचा अधिवास आहे. आयआयटी मुंबईलगतचा परिसर, रेनिसंस हॉटेलजवळील भाग, पवई उद्यानातील तलावाला लागून असलेल्या भगात मगरींचे वास्तव्य आढळले आहे. तसेच तलावातील छोट्या टेकड्यांवर मगरींचे अधूनमधून दर्श घडते. या मगरींचे संवर्धन आणि संर७ण करण्याच्या उद्देशाने जुलै २०२२ मध्ये महानगरपालिकेने पहिल्यांदाट मगरींची गणना केली होती. गणनेनुसार पवई तलावात साधारण १८ प्रौढ मगरी असल्याचे निदर्शनास आले होते.

यापूर्वीही मगरीची सुटका

मागील वर्षी पवई येथील मोरारजी नगर परिसरातील साकी विहार रस्त्याजवळील ५ फूट खोल खड्ड्यात सुमारे पाट फुटी मगर आढळूल आली होती. रेस्क्यूइंक असोसिएशन फॉर वाईल्डलाईफ वेल्फेअर या प्राणी संघटनेचे कार्यकर्ते आणि विनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘मार्श’ प्रजातीच्या ४.६ फुटांच्या नर मगरीची सुटका केली होती. संपूर्ण खड्ड्यावर जाळी आच्छादून मगरीला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मगर जाळ्यात येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागली.

मगर जाळ्यात सापडल्यानंतर तिची पशुवैद्यकीय पथकाने वैद्यकीय तापासणी केली. मगर सुरक्षित असल्याचे घोषित केल्यानंतर मुंबई परिक्षेत्रातील वन अधिकाऱ्यांच्या मदतीने मगरीला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.मगरीची सुटका करण्यात आलेले ठिकाण पवई तलावाजवळ आहे. पवई तालावात मगरींचा अधिवास असून अनेकदा मोठ्या मगरी पवई तालावातून विहार तलावाकडे स्थलांतर करण्याचा प्रयत्न करतात. अन्नाच्या शोधात क्ंवा अंदाज न आल्याने ती खड्ड्यात पडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

मगरीच्या पिल्लाची तस्करी

पवई तलावात मगरींचा अधिवास असून अनेकदा मोठ्या मगरी पवई तलावातून विहार तलावाकडे स्थलांतर करण्याचा प्रयत्न करतात. गेल्या वर्षी आरोपीने तस्करी केलेले मगरीचे पिल्लू आयआयटी पवई परिसरात विक्रीसाठी आणले होते. मगरीच्या पिल्लाची विक्री करण्यासाठी या परिसरात येणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे आयआयटी पवईच्या प्रवेशद्वारासमोर जोगेश्वरी जोडरस्त्यावर वन विभागाने सापळा रचला होता. संशयास्पद व्यक्ती दिसताच वन विभागाच्या अदिकारी, कर्मचाऱ्याने त्याला ताब्यात घेतले होते. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे मगरीचे पिल्लू सापडले होते.