पवई तलावातील अधिवास धोक्यात;  जबाबदारी घेण्यास पालिका, वनविभागाचा नकार
आसपासच्या इमारतींतून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे पवई तलाव प्रदूषित होत चालला असताना या तलावाची ओळख बनलेल्या मगरींचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. सांडपाण्यासोबतच तलावकाठावर होणारा कचरा, जॉगिंग ट्रॅक यांमुळे पवई तलावात उरलेल्या दहा मगरींचे अधिवास संपुष्टात येत आहेत. मात्र, या मगरींचे संवर्धन करण्यास अथवा त्यांचे पालकत्व घेण्यास महापालिका किंवा ठाणे वन विभागाने नकार दिला आहे.
मुंबई शहरात निसर्ग वैभव आणि जैव-विविधता लाभलेला पवई तलाव हा या मुंबईचे ‘निसर्ग लेणे’ म्हणून सर्वदूर परिचित आहे. मात्र ही ओळख पुसली जात असून तलावात सध्या मोठय़ा प्रमाणावर सांडपाणी या तलावात सोडले जात आहे. तलावात असलेल्या मगरींनाही याचा त्रास होत आहे. या तलावात अंदाजे दहापेक्षा अधिक मगरी असण्याची शक्यता असून त्यांची गणना न झाल्याने त्यांचा खरा आकडा माहित नाही. मात्र तलावातील नारळाच्या झाडांखाली मगरींचे दर्शन नित्यनियमाने होते, असे पर्यावणप्रेमी सांगतात. तलावात सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी, पर्यटकांकडून होणारा कचरा, तसेच पालिकेने बांधलेले ‘जॉगिंग ट्रॅक’ यामुळे मगरींचे तलावाच्या किनाऱ्यांनजीकचे अधिवास बुजल्याने त्यांना अंडी घालणे अडचणीचे झाले आहे. ‘सध्या येथील प्रदूषण व अनधिकृत मासेमारी थांबवण्याची आवश्यकता असून यावर पालिका व वन विभाग निष्क्रिय झाल्याचे दिसून येते. २०११ साली पालिकेचे सुशोभीकरणाचे काम सुरू असताना दोन मगरींचा मृत्यूही ओढावला होता,’ असे ‘पॉझ’ या पर्यावरणप्रेमी संस्थेचे प्रमुख सुनीश कुंजू यांनी सांगितले.
पालकत्व झिडकारले
पवई तलावातील मगरींचे जीवन धोक्यात आल्याबद्दल मुंबई महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी व पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ठाणे वन विभागाकडे बोट दाखवले. याबाबत ठाणे जिल्हा वन अधिकारी किशोर ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आम्ही या तलवात हिंस्र मगरी आहेत, असे फलक लावले असून नागरिकांनी तलवात उतरू नये असे सूचित केले. मात्र, तलावात सांडपाणी सोडणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुढील काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे, पालिका व वन विभाग आपल्या जबाबदाऱ्या झटकत असून याने येथील मगरी मात्र नामशेष होण्याची भीती व्यक्त होत आहे.

जाळय़ात मगरींची अंडी
तलावाच्या किनाऱ्यानजीकच्या पाण्यात अनधिकृत मच्छीमारांकडून मासेमारी करण्यात येते. या मच्छीमारांना हटकण्यासाठी वन विभाग व पालिकेकडून कोणाचीही नेमणूक न करण्यात आल्याचे दिसून येते. यातील एका मच्छीमाराने धक्कादायक खुलासा केला की, आमच्या जाळ्यात अनेकदा मगरींची अंडी येतात, ती आम्ही टाकून देतो. अशावेळी मगरींनी हल्ला करून आमचे पाय ओढले आहेत. पण, पोटासाठी ही जोखीम पत्करतो.

Story img Loader