लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: पंखे आणि पंप निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स विद्यमान आर्थिक वर्षात १ अब्ज डॉलरच्या विक्रीचा टप्पा ओलांडेल आणि योजलेल्या नवीन धोरणामुळे दुहेरी अंकातील महसूल वाढ साध्य करेल, अशी आशा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमीत घोष यांनी गुरुवारी व्यक्त केली.

आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन तिमाहीत कंपनीने ६,००० कोटी रुपयांच्या उलाढाल केली असून, ३१ मार्च २०२४ अखेर सरलेल्या आर्थिक वर्षात क्रॉम्प्टन ग्रीव्हजचा एकत्रित महसूल ७,३१२.८१ कोटी रुपयांवर होता. विद्यमान आर्थिक वर्षात कंपनीने सुमारे १ अब्ज डॉलर अर्थात ८,६०० कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूलाचा टप्पा गाठेल, असा आशावाद व्यक्त केला. क्रॉम्प्टनने न्यूक्लियस या श्रेणीअंतर्गत दोन नवीन पंख्याचे गुरुवारी अनावरण केले.

येत्या पाच ते सहा वर्षांत उलाढाल दुपटीवर नेण्याचे लक्ष्य राखून क्रॉम्प्टन २.० हा नवीन दृष्टिकोन कंपनीने स्वीकारला आहे. या अंतर्गत, ग्राहक केंद्रितता, व्यवसाय वाढ आणि नवोपक्रमांद्वारे नफा वाढीवर कंपनी भर देत आहे. क्रॉम्प्टन ग्रीव्हज ही पंखे, दिवे, पाण्याचे पंप आणि उपकरणे यासारख्या विभागांमध्ये कार्यरत आहेत. देशात दरवर्षी ४ कोटींहून अधिक पंखे विकले जातात, तर क्रॉम्प्टनने आर्थिक वर्ष २०२४ मध्ये दोन कोटींहून अधिक पंखे विकले असून या क्षेत्रातील ती पहिल्या क्रमांकाची कंपनी ठरली आहे.

Story img Loader