समाजात समतेचे बीज रोवणारे महात्मा जोतिबा फुले यांच्या नावाचा जयघोष करत समाजकारण करणारे खासगी आयुष्यात मात्र जोतिबांच्या साधी राहणीमानाचा वसा कसा गुंडाळून ठेवतात, हे पाहायचे असेल तर नाशिकच्या आग्रा रोडवरील भुजबळ फार्मला भेट द्या. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या कुटुंबियांनी याठिकाणी उभारलेली कोटय़वधी रुपयांची भव्य दिव्य हवेली पाहिल्यावर राजे-रजवाडय़ांच्या संपन्नेतचीच आठवण येते. प्राचीन आणि आधुनिक बांधकाम शैलीची ‘समता’ साधणाऱ्या या महालात अलिकडेच भुजबळ कुटुंबिय वास्तव्यास गेले आहे.
जुन्या काळातील राजेशाही महालाची छोटी आवृत्ती शोभावी अशी या अलिशान हवेलीची रचना असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे भुजबळ कुटुंबियांशी संबंधित अगदीच मोजक्या व्यक्तींना या वास्तूचे दरवाजे खुले आहेत. ज्यांनी कोणी या वास्तूचे दर्शन घेतले, त्यांची आजवर नाशिकमध्ये या स्वरुपाची अलिशान वास्तू पाहिली नसल्याची प्रतिक्रिया बोलकी म्हणावी लागेल.
भुजबळ कुटुंबियांची शहराच्या मध्यवस्तीत मुंबई-आग्रा महामार्गालगत सिडकोजवळ बरीच मोठी जागा आहे. तो परिसर भुजबळ फार्म म्हणून ओळखला जातो. हा संपूर्ण     
परिसर सात ते आठ फूट उंचीची संरक्षक भिंत आणि त्यालगत उंच उंच झाडांनी वेढलेला असल्याने बाहेरून नव्याने बांधलेली वास्तू दृष्टिस पडत नाही. आवारातील ‘चंद्राई’ या जुन्या बंगल्याच्या मागील बाजूस बांधलेली ही वास्तू पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी असल्याचे सांगितले जाते.जवळपास दोन वर्षे तिचे काम सुरू होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भुजबळ कुटुंबिय नव्या वास्तूत राहण्यास गेले.
सुमारे ३० हजार चौरस फूट आकाराच्या दुमजली वास्तुचे बांधकाम पुरातन काळातील वाडे- महालांची प्रचिती देणारे आहे. त्यास जलतरण तलाव, टेनिस मैदान, विस्तीर्ण हिरवळ असा आधुनिक स्पर्श देण्यात आला आहे. वास्तूत प्रवेश करणाऱ्यास अलीशान राजस्थानी वाडय़ात प्रवेश करत असल्याची अनुभूती मिळेल. तळ मजल्यावर वाचनालय, ‘होम थिएटर’, सभागृह, स्वयंपाक गृह, देवघर, तुळशी वृंदावन असा अनोखा संगम साधला गेला आहे. आतमध्ये छोटय़ाशा जागेवर हिरवळ असून हा भाग छताविना ठेवण्यात आल्याने सूर्यप्रकाश हिरवळीला मिळू शकतो. दुसऱ्या मजल्यावर शयनगृहांची रचना करण्यात आली आहे. १५ ते १८ विस्तिर्ण दालने सामावणाऱ्या या वास्तुच्या स्तंभांना विशिष्ट अशी कलाकुसर करण्यात आली आहे. वारली चित्रांचाही कल्पतकेने वापर करण्यात आला आहे. स्वयंपाकगृहात तर रचनेच्या एकेक करामती करण्यात आल्या आहेत. फ्रिज, गॅस, सिलिंडर अशी एकही वस्तू बाहेर दिसत नाही. सर्व काही भिंतीत ंबंदीस्त, असे पाहणारे सांगतात. खिडक्यांसाठी उच्च प्रतीचे लाकूड, नक्षीदार फर्निचर, विविध कलाकृतींच्या इटालियन मार्बलने सजलेले फ्लोअरिंग आणि डोईवर कौलारु छताचा ताज वास्तूच्या श्रीमंतीत भर टाकते. राज महालाशी साधम्र्य साधणाऱ्या या वास्तूतील फर्निचरही तितक्याच उच्च दर्जाचे असल्याचे पाहणारे सांगतात.
रात्री हा परिसर प्रकाशझोताने उजळून निघतो. सभोवतालच्या झाडांवर रंगीत दिवे लावले जातात. त्यामुळे अंधारातही हवेलीचे सौंदर्य नजरेत भरण्याजोगे असते. फार्मच्या परिसरात एका बाजूस भुजबळ यांचे कार्यालय आहे. या ठिकाणी स्थानिक पदाधिकाऱ्यांची कायम वर्दळ असते. तरीही बहुतेकांना या वास्तूविषयी फारशी माहिती नाही. कारण, तिचे दर्शनही कित्येकांना झालेले नाही. काही जणांनी दूरून दर्शन घेतले असले तरी आतमध्ये त्यांना जाता आलेले नाही. हवेलीकडे जाणाऱ्या परिसरात सुरक्षारक्षक तैनात आहे. या ठिकाणी कुटुंबीय अथवा ‘साहेबां’च्या मर्जीतील दोन-चार माणसे वगळता कोणालाही प्रवेश नाही. भुजबळ कुटुंबीयांनी साकारलेल्या या वास्तूसाठी उच्चतम दर्जाच्या साहित्याचा कल्पकतेने वापर केला आहे. या स्वरुपाच्या बांधकामासाठी नामांकित वास्तुविशारद तीन ते पाच हजार प्रति चौरस फूट दर आकारतात. बांधकामाच्या दराचा विचार केल्यास वास्तूच्या बांधकामावर कोटय़वधींचा खर्च केल्याचे दिसते. या वास्तूच्या बांधकाम आराखडा व पूर्णत्वाचा दाखला यासंदर्भात महापालिका नगररचना विभागाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून हे प्रकरण छाननी प्रकियेत असल्याचे सांगत त्याविषयी अधिक माहिती देणे टाळले. तर भुजबळ यांच्याकडूनही याबाबत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा