रेल्वे बोर्डाचा सदस्य महेशकुमार याने दडविलेल्या बॅगा सीबीआयच्या हाती लागल्या असून त्यात कोटय़वधी रुपयांच्या मालमत्तेची कागदपत्रे हाती लागली आहेत. महेशकुमारची पत्नी आणि रेल्वे सुरक्षाबलाच्या एका अधिकाऱ्याने छाप्यापूर्वी या दोन बॅगा लपविल्या होत्या.
बदलीसाठी ९० लाख रुपयांचीलाच देणाऱ्या महेशकुमारला दिल्ली सीबीआयने अटक केली होती. त्या वेळी त्याच्या मुंबईतल्या निवासस्थानावर छापे घालण्यात आलेहोते. या छाप्यांच्या आधी महेशकुमारची पत्नी अंजली कुमारने रेल्वे सुरक्षा बलाचा पोलीस निरीक्षकस्वामी याला घरातील दोन बॅगा लपविण्यास सांगितले होते. स्वामीने या दोन बॅगा टॅक्सीतून मुंबईतील त्याच्या एका नातेवाईकाकडे दडवून ठेवल्या होत्या. महेशकुमारच्या चौकशीत ही बाब समोर आली आहे. सीबीआयनेभाइंदर येथून या दोन बॅगा जप्त केल्या आहेत. या बॅगात कोटय़वधी रुपयांच्या मालमत्तेची कागदपत्रे सीबीआयच्या हाती लागली आहेत. त्यात कर्नाटकात जमीन, गुरगाव येथील १ कोटी ८२ लाख रुपये किमतीचा फ्लॅट, तसेच द्वारका आणि नोएडा येथे ४ कोटी रुपयांचे फ्लॅटस् आदींची कागदपत्रे आढळली आहेत. याशिवाय ५० लाखांची राष्ट्रीय बचतपत्रे, मोठय़ा
ब्रॅण्डेड दुकानांची दोन लाखांची गिफ्ट व्हाऊचर्स सापडले आहेत. काही बँकांचे पासबुकही सापडले असून त्याचा तपास सुरू आहे. या बॅगेत छोटय़ा खोक्यांमध्ये सोने आणि हिऱ्यांचे दागिने सापडले आहेत. त्यांची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या शिवाय २५ स्टँपपेपर्स सापडले आहेत. हे स्टँपपेपर्स २००४ ते २०१२ या काळात खरेदी करण्यात आले होते. हे स्टँपपेपर्स अंजली आणि दोन मुलांच्या नावावर घेण्यात आलेले आहेत. अनेक अधिकारी धास्तावले महेशकुमारला अटक झाल्यावर मुंबईतील आणखी काही वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येणार असल्याने अनेक रेल्वे अधिकारी धास्तावले आहेत. त्यामुळे अनेकांनी सुटीवर जाण्यास सुरुवात केली आहे. महेशकुमारसमवेत आपले विशेष संबंध नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न अनेक अधिकारी करत आहेत.
मध्यस्थास अटक
रेल्वेमंत्री पवन बन्सल यांचा भाचा विजय सिंग्ला याचा निकटवर्ती अजय गर्ग याने मंगळवारी दिल्लीच्या न्यायालयात शरणागती पत्करली. त्याला अटक करण्यात आली आहे. उद्यापर्यंत त्याला सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. रेल्वेतील लाचखोरीप्रकरणी सीबीआयचे अधिकारी शोध घेत असल्याचे गर्ग याला प्रसारमाध्यमांतील बातम्यांवरून समजले. त्यानंतर त्याने शरणागती पत्करली.