लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई: सीमापार व्यापारासाठी भारतीय रुपया आणि मॉरिशस रुपयाच्या (एमयूआर) वापराला प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँक आणि बँक ऑफ मॉरिशस (बीओएम) दरम्यान करार करण्यात आला असून, उभय मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर अनुक्रमे संजय मल्होत्रा आणि रामा कृष्णा सिथानेन जीसीएसके यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांच्या उपस्थितीत पोर्ट लुईस, मॉरिशस येथे गेल्या आठवड्यात १२ मार्च २०२५ रोजी सामंजस्य कराराच्या कागदपत्रांची देवाणघेवाण करण्यात आली. द्विपक्षीय व्यापारात भारतीय रुपया आणि एमयूआरच्या वापराला प्रोत्साहन देणे हा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे. दोन्ही देशांनी मान्य केलेल्या सर्व चालू खाते व्यवहार आणि परवानगीयोग्य भांडवली खाते व्यवहारांचा या सामंजस्य करारात समावेश आहे. या करारामुळे निर्यातदार आणि आयातदारांना त्यांच्या देशांतर्गत चलनांमधून देयक व्यवहार पूर्ण करता येतील.