वसरेवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावरील मुंबईतील पहिली मेट्रो रेल्वे रविवारी सकाळी सुरू झाली आणि सुट्टीची संधी साधून पहिल्याच दिवशी वातानुकूलित मेट्रो पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी मुंबईकरांची अशी काही गर्दी उसळली की मेट्रोचे डबे आणि स्थानके प्रवाशांनी भरून गेले. मेट्रोला जणू काही लोकलचेच स्वरूप आले होते. या प्रचंड गर्दीला सामावून घेण्यासाठी मेट्रो रेल्वे ठिकठिकाणच्या स्थानकांवर अध्र्या मिनिटाऐवजी दोन-पाच मिनिटे थांबवावी लागत होती आणि त्यामुळे वसरेवा ते घाटकोपर या प्रवासाला २१ मिनिटांऐवजी बऱ्याचवेळा ४५ ते ५० मिनिटे लागली.
रविवारी दुपारी एक वाजता मेट्रो प्रवाशांसाठी खुली होणार असे जाहीर झाले. त्यामुळे वातानुकूलित प्रवास आणि उंचावरून मुंबापुरीचे दर्शन घडवणाऱ्या प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी मुंबईकरांनी सकाळपासूनच गर्दी करण्यास सुरुवात केली. ऐन सुटीच्या दिवशी मुंबई मेट्रोचा पहिल्या दिवशीचा प्रवास करण्याची ऐतिहासिक संधी साधण्यासाठी केवळ मुंबईकरच नव्हे तर थेट उल्हासनगर, ठाणे अशा दूरवरच्या उपनगरांतूनही रविवारचा मेगाब्लॉकचा प्रचंड दगदगीचा प्रवास करून लोक आपल्या कुटुंबासह घाटकोपरला थडकत होते. मुंबई शहर व पश्चिम उपनगरातील मंडळी अंधेरी स्थानकावर उतरून मेट्रोच्या अंधेरी स्थानकावर गर्दी करत होती. अनेक मेट्रो स्थानकांबाहेरील जिन्यांवर भर दुपारी तीनच्या सुमारासही वरपासून खालपर्यंत रांगा लागल्या होत्या. तरुण मित्रमंडळींच्या जथ्थ्याबरोबरच अबालवृद्ध मेट्रोयात्रेसाठी हजर झाले.
मेट्रोची स्थानके, मेट्रोचे डबे मेट्रो पर्यटकांनी फुलून गेले. जो-तो आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात मेट्रो स्थानकांचे, मेट्रो रेल्वेचे आणि आपले फोटो काढून घेत होता. बाजून विरुद्ध दिशेची मेट्रो आली की त्यातील अनोळखी प्रवाशांना हात करून मुंबई मेट्रो सुरू झाल्याचा आनंद व्यक्त करत होती. घाटकोपर-अंधेरी मार्गावर कार्यालयाला जाण्यासाठी येणारी काही मंडळी मेट्रो सुरू झाल्याने भलतीच खूष होती. ‘आता शांतपणे ऑफिसला जाता येईल. या रस्त्यावर रिक्षावाल्यांची दादागिरी फार वाढली होती. आता त्यांना चांगला दणका बसेल..’ अशा प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. मेट्रोच्या डब्यांत लोकलसारखी गर्दी झाली तरी उकाडा न वाढता गारवा कायम राहत असल्याचा अनुभव येताच..‘एसी पॉवरफुल आहे.’ अशा शब्दात मेट्रो प्रवासाचे कौतुक होत होते. मेट्रो रेल्वे पश्चिम द्रुतगती महामार्गावरून काटकोनात जात असताना रस्त्याचे ते दृश्य टिपण्यासाठी भव्य काचेच्या खिडक्यांजवळ प्रवासी आपले भ्रमणध्वनी सरसावत होते.
मेट्रो पर्यटनासाठी झुंबड!
वसरेवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावरील मुंबईतील पहिली मेट्रो रेल्वे रविवारी सकाळी सुरू झाली आणि सुट्टीची संधी साधून पहिल्याच दिवशी वातानुकूलित मेट्रो पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी मुंबईकरांची अशी काही गर्दी उसळली की मेट्रोचे डबे आणि स्थानके प्रवाशांनी भरून गेले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-06-2014 at 05:38 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crowd for metro tourism