लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसर आणि मुंबई पोलिसांच्या परिमंडळ -१ च्या उपायुक्तांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच फेरीवाल्यांनी पथाऱ्या पसरल्या असून फेरीवाल्यांच्या कलकलाटात हा परिसर गुदमरू लागला आहे. त्यामुळे सीएमएमटी स्थानकात जाणारे-येणारे प्रवासी आणि पादचाऱ्यांना पदपथ आणि रस्त्यावरून चालण्यासाठी मुष्कीलीनेच वाट काढावी लागत आहे. मात्र मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्यामुळे नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागते आहे.

सीएसएमटी स्थानकात दररोज लाखो प्रवासी ये-जा करीत असतात. त्याला लागूनच असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या भाटिया बाग आगारामध्येही प्रवाशांची वर्दळ असते. त्यामुळे सीएसएमटी आणि आसपासचा परिसरात कायमच प्रचंड गर्दी असते. कार्यालयीन वेळेत सकाळी आणि घरी परत जाण्याच्या संध्याकाळच्या वेळी मोठ्या संख्येने प्रवासी रेल्वे स्थानकात जात-येत असतात. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन असंख्य फेरीवाल्यांनी अगदी रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारापासून अवघ्या काही फुटांवर पथाऱ्या पसरल्या आहेत. इतकेच नव्हे तर स्थानकाबाहेर पदपथावर एका रांगेत फेरीवाल्यांनी ठिय्या मांडला आहे. तयार कपडे, सुगंधी अत्तर, चांमड्याच्या वस्तू, खेळणी आदींचे स्टॉल फेरीवाल्यांनी मांडले आहेत. मोठमोठ्या आवाजात ओरडून फेरीवाले आपल्या वस्तूंची विक्री करीत असतात. फेरीवाल्यांच्या त्रास कमी की काय त्यातच या परिसरात ठिकठिकाणी अनधिकृत टॅक्सी थांब्याचे स्वरुप आले आहे. परराज्यातून अथवा परज्यातून सीएसएमटी स्थानकात येणाऱ्या रेल्वे गाड्यांतील प्रवाशांचे भाडे मिळविण्यासाठी टॅक्सीचालकांमध्ये स्पर्धाच सुरू असता. टॅक्सी रस्त्यामध्येच थांबवून भाडे मिळविण्याचा प्रयत्न अनेक चालक करीत असतात. यामुळे वाहतूक आणि पादचाऱ्यांना अडथळा होत असतो. परंतु त्याचे कुणालाच सोयरसूतक नसते.

आणखी वाचा-प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलगी, जावयाची निर्घृण हत्या; गोवंडी पोलिसांकडून चौघांना अटक

मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या मुंबई पोलीस दलाच्या परिमंडळ – १च्या उपायुक्तांच्या कार्यालयासमोरील पदपथावर फेरीवाल्यांचा कलकलाट सुरू असतो. एका रांगेत फेरीवाल्यांनी आपापल्या पथाऱ्या पसरल्या असून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जोरजोरात ओरडून फेरीवाले विक्रीला ठेवलेल्या वस्तूंची जाहिरातबाजी करीत असतात. फेरीवाल्यांच्या पथाऱ्यांमुळे पादचाऱ्यांना पदपथावरून चालणे मुष्कील होते. परिणामी, पादचारी रस्त्यावरून मार्गक्रमण करावे लागते. रस्त्यावर कडेला उभ्या केलेल्या टॅक्सीमुळे तेथूनही चालताना पादचाऱ्यांना तारेवरची कसरतच करावी लागते. इतकेच नव्हे तर या सर्वांचा वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयाजवळच अशी स्थिती असल्यामुळे न्याय कुठे मागायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आणखी वाचा-“महाराष्ट्रात एक समलैंगिक पद्धतीचे सरकार सुरू आहे आणि…”; ठाकरे गटाचा हल्लाबोल

मुंबई महानगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी पथकाचे वाहन कारवाई करण्यास येण्यापूर्वीच फेरीवाल्यांना वर्दी मिळते. मग ते आसपासच्या गल्ल्या, इमारतींच्या आश्रयाला जातात. विक्रीयोग्य वस्तू इमारतींमध्ये दडवून पदपथ रिकामे केले जातात. काही वक्रिेते रिकाम्या वाहनांमध्ये या वस्तू ठेवतात. बहुसंख्य फेरीवाले भाटियाबाग उद्यानाचा आसरा घेतात. महानगरपालिकेची कारवाई करणारे वाहन निघून गेल्यानंतर पुन्हा पदपथांवर पथाऱ्या पसरून फेरीवाल्यांचा बिनबोभाट कलकलाट सुरू होतो. त्यामुळे कारवाईबाबतही प्रश्न निर्माण होत आहेत.

दरम्यान, या संदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या परिमंडळ-१ च्या उपायुक्त संगीता हसनाळे आणि ‘ए’ विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयदीप मोरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crowd of hawkers on the footpath mumbai print news mrj