सुशांत मोरे

टर्मिनस झाल्यामुळे प्रवासी संख्येत भर

परळ टर्मिनस सेवेत येताच येथून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत दोन दिवसांत ११ हजारांची भर पडली आहे. दादपर्यंत येणाऱ्या उपनगरी रेल्वे गाडय़ांचा परळपर्यंत विस्तार झाला झाल्यामुळे गर्दीत वाढ झाली आहे.

दादर स्थानकावरील भार कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने परळ टर्मिनसची निर्मिती केली आहे. या स्थानकातून आजवर २९ हजार प्रवासी दररोज तिकीट काढून प्रवास करत; आता ही संख्या प्रतिदिन ४० हजारांवर गेल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. अर्थात परळ टर्मिनसचा फायदा आजूबाजूच्या परिसरांत राहणाऱ्यांना होत असला तरी त्यामुळे काही दिवस दादरमधून नियमितपणे लोकल पकडणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप होऊ शकतो.

रुग्णालये, महाविद्यालये, सरकारी आणि खासगी कार्यालये यांबरोबरच नव्याने उभी राहिलेली गृह व व्यापारी संकुले यामुळे परळ स्थानकातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांत भर पडते आहे. या स्थानकाला लागूनच पश्चिम रेल्वेचे प्रभादेवी स्थानक आहे. तिथे उतरून परळ स्थानकातून लोकल पकडणारेही अनेक प्रवासी आहेत. त्यामुळे परळ स्थानकावर प्रवाशांचा मोठा भार पडत होता. मात्र त्या तुलनेत पायाभूत सुविधा नसल्याने लोकल फेऱ्या वाढविता येत नव्हत्या. त्यामुळे तो भार दादर स्थानकावर येत होता.  ४ मार्चपासून परळ टर्मिनस प्रवाशांच्या सेवेत आले आणि दादरच्या काही फेऱ्या येथे वळविण्यात आल्या.

परळमधून दररोज अप-डाऊन ३२ फेऱ्या सोडण्यात येत आहेत. याच स्थानकात दररोज तिकीटधारक प्रवाशांची संख्या २९ हजार ९८० एवढी होती. हीच संख्या ४ मार्च रोजी ३१ हजार ६१३ पर्यंत पोहोचली आणि ५ मार्चपर्यंत ४० हजार ६०० पर्यंत पोहोचल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले. परळमधील गर्दी वाढत असून येत्या काही दिवसांत त्यात आणखी भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

१५ डब्यांना पूरक फलाट

सध्या परळ टर्मिनसमधून १६ लोकल फेऱ्या सुटतात व १६ फेऱ्या येतात. टर्मिनसचे फलाट पंधरा डबा गाडय़ांना पूरक ठरतील असे बांधण्यात आले आहेत. येथून विस्तार झालेल्या धिम्या लोकलबरोबरच जलद लोकलही सोडण्याचा विचार मध्य रेल्वेकडून करण्यात आला होता; परंतु तांत्रिक कारणास्तव तो मागे पडला. परंतु त्याचा नंतरही विचार होऊ शकतो, असे सांगण्यात आले.