मुंबई : आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकरशेट यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखविण्यात आला. भारतीय रेल्वेच्या इतिहासात कोणतीही एक्स्प्रेस विनाबॅकर, विनापुश-पूल घाट भागात चढू अथवा उतरू शकली नाही. मात्र सुमारे १५० वर्षांनंतर हे वंदे भारत एक्स्प्रेसमुळे शक्य झाले आहे. ही एक्स्प्रेस पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.
मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर या वंदे भारत एक्स्प्रेसचे शुक्रवारी लोकार्पण झाले. मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसचे सारथ्य लोको पायलट लाल कुमार आणि एम. टोप्पो यांनी केले. तर मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसचे सारथ्य लोको पायलट पॉल के. आणि तुम राव यांनी केले. वंदे भारत चालवून इतिहासाचे साक्षीदार होण्याचा मान मिळाला आहे. थळ आणि बोर घाटात एक्स्प्रेस चालविण्याचा वेगळा अनुभव मिळाल्याचे लोको पायलटनी व्यक्त केले.
पांढराशुभ्र रंग, गडद निळय़ा रंगांची चमक, इंजिनच्या दिशेने निमुळती अशी आकर्षित वंदे भारत एक्स्प्रेस असून ही एक्स्प्रेस पाहताच अनेकांना मोबाइलमध्ये छायाचित्र टिपण्याचा मोह आवरता आला नाही. ही एक्स्प्रेस दिसायला जेवढी आकर्षित, तेवढाच तिचा वेगही सुसाट आहे. बुलेट ट्रेनसारख्या विशिष्ट आकाराची ही एक्स्प्रेस वेगात धावते. मुंबई-सोलापूर, शिर्डी संपूर्ण प्रवासात या एक्स्प्रेसने प्रतितास ११० किमी वेग धरला होता. तसेच घाट भागात या एक्स्प्रेसला कोणत्याही इंजिनाची (बॅकर)ची आवश्यकता नसल्याने प्रवासात बचत होत आहे.
नरेंद्र मोदी यांचा जयघोष
सीएसएमटी, दादर, कल्याण येथे वंदे भारत एक्स्प्रेसने थांबा घेताच अनेक प्रवासी, भाजप कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा जयघोष केला.
सुविधा काय?
एक्स्प्रेसमध्ये ऑन-बोर्ड वाय-फाय इन्फोटेनमेंट, जीपीएस आधारित प्रवासी माहिती प्रणाली, प्लश इंटीरियर्स, झोपण्यायोग्य आसने, टच-फ्री सुविधांसह बायो व्हॅक्यूम टॉयलेट्स, एलईडी प्रकाश योजना, प्रत्येक आसनाखाली चार्जिग पॉइंट्स, वैयक्तिक स्पर्श आधारित रीडिंग लाइट आणि कनसील्ड रोलर पडदे, आधुनिक मिनी-पॅन्ट्री आणि चालक दलाशी संवाद साधण्याकरिता प्रवाशांसाठी ‘इमरजन्सी टॉक-बॅक’ युनिट, जंतूमुक्त हवेच्या पुरवठय़ासाठी अतिनील दिव्यांसह वातानुकूलित प्रणालीसारख्या प्रवासी सुविधांचा समावेश आहे.
प्रवास तिकीट दर, खानपान सेवा शुल्कासह तिकीट दर
- सीएसएमटी – साईनगर शिर्डी चेअर कार ८४० रुपये, एक्झिक्युटिव्ह क्लास एक हजार ६७० रुपये
- सीएसएमटी – सोलापूर चेअर कार एक हजार १०, एक्झिक्युटिव्ह क्लास – दोन हजार १५ रुपये
- सीएसएमटी – साईनगर शिर्डी चेअर कार ९७५ रुपये, एक्झिक्युटिव्ह क्लास एक हजार ८४० रुपये
- सीएसएमटी – सोलापूर चेअर कार एक हजार ३०५ रुपये, एक्झिक्युटिव्ह क्लास दोन हजार ३०५ रुपये
वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करून अत्यानंद होत आहे. आलिशान आसने, गारेगार हवा, यामुळे सहप्रवाशांसोबत आनंद लुटला.
– आरती भोईर, प्रवासी
सीएसएमटीवरून वंदे भारतचा प्रवास सुरू केला. सर्व सोयी चांगल्या आहेत.
– कांचन कुलकर्णी, प्रवासी