लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : मुंबईत २६/११ च्या हल्ल्यापूर्वी आलेल्या तहव्वूर राणाने दक्षिण मुंबईतील गर्दीच्या ठिकाणांबाबत साक्षीदारासोबत चर्चा केली होती. याच ठिकणांचा उल्लेख डेविड हेडलीच्या संभाषणातही असून पुढे त्या ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला. हेडलीविरोधात मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात साक्षीदाराच्या जबाबाचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबई हल्ल्यात दहशतवाद्यांनी दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस आणि लिओपोल्ड कॅफे या ठिकाणांना लक्ष्य केले होते.
मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी डेविड हेडली २००६ ते २००८ या दोन वर्षांमध्ये आठ वेळा मंबईत आला होता. त्यावेळी त्याने हल्ला झालेल्या ठिकाणांची पाहणी केल्याचा आरोप आहे. पण हल्ल्यापूर्वी हेडलीऐवजी राणा मुंबईत आला होता. राणा अमेरिकेहून प्रथम दुबईला गेला. तो १२ नोव्हेंबर, २००८ रोजी विमानाने मुंबईत आला. पवईतील एका आलीशान हॉटेलमध्ये तो वास्तव्याला होता. पवईतील हॉटेलमध्ये २० आणि २१ नोव्हेंबर रोजी वास्तव्याला असताना त्याने साक्षीदारासोबत दक्षिण मुंबईतील गर्दीच्या ठिकाणांबाबत चर्चा केली होती. हल्ल्याच्या वेळी दहशवाद्यांनी याच ठिकाणांना लक्ष्य केले. पण हल्ल्याच्या पाच दिवसआधी म्हणजे २१ नोव्हेंबर रोजी त्याने मुंबई सोडली. तेथून तो दुबईला गेला. त्याने तेथून २४ नोंब्हेबर रोजी चीनचा प्रवास केला.
तेथे दोन दिवस राहिल्यानंतर हल्ल्याच्या दिवशीच म्हणजे २६ नोव्हेंबर, २००८ रोजी त्याने चीनहून अमेरिकेतील शिकागो गाठले. राणा शिकागोला पोहोचेपर्यंत २६ नोव्हेंबर २००८ रोजी रात्री १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईवर दहशतवादी हल्ला केला. त्यात १६४ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला. भारतीय यंत्रणांनी केलेल्या कारवाईत नऊ दहशतवादी ठार झाले. हा हल्ल्या करणाऱ्या १० पैकी एक दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडण्यात आले होते. त्याच्यावर न्यायालयीन प्रक्रिया राबवण्यात आली. त्यानंतर कसाबला पुण्यातील येरवडा तरुंगातच फाशी देण्यात आली. शिक्षा झाल्यानंतर नोव्हेंबर २०१२ मध्ये त्याला फाशी देण्यात आली. या संपूर्ण हल्ल्याची माहिती राणाला होती.
कोण आहे राणा ?
पाकिस्ताना स्थायिक असताना राणा तेथील लष्करामध्ये वैद्यकीय विभागात कार्यरत होता. त्याने १९९० मध्ये पाकिस्तानी लष्करातील नोकरी सोडली. त्यानंतर राणाने कॅनडाचे नागरिकत्त्व स्वीकारले. त्यानंतर तो अमेरिकेत स्थायिक झाला. डेविड हेडलीने भारतात रेकी केली त्यावेळी त्याने थेट पाकिस्तानात दूरध्वनी करणे टाळले. त्याऐवजी हेडली राणाशी संपर्क साधून माहिती द्यायचा. ही माहिती पुढे राणाकडून पाकिस्तानातील हँडलर्सला पुरवली जायची. मुंबई दहशतवादी हल्ल्यातील सहभागी तहव्वूर हुसैन राणाला प्रत्यर्पण करून आणण्यात आले आहे.
राणामुळेच हेडलीचा मुंबई प्रवास झाला सोपा
मुंबईत दहशतवादी हल्ल्या करण्यापूर्वी येथील रेकी करण्याची जबाबदारी याप्रकरणातील आरोपी डेविड हेडलीवर सोपवण्यात आली होती. कोणाला संशय येऊ नये त्यासाठी डेविड हेडलीचा मुंबई दौरा व्यावसायिक कामासाठी दाखवण्यात आला होता. त्यासाठी राणाचा मोठा सहभाग आहे. राणाचा इमिग्रेशन व्यवसाय होता. त्याचाच आधार घेऊन त्याच्या कंपनीची एक शाखा मुंबईतील ताडदेव परिसरात सुरू होत असल्याचे चित्र उभे करण्यात आले.
त्यासाठी मुंबईत एक इमिग्रेशन सेंटर उभे करण्यात आले. त्याच्याच कामासाठी हेडली मुंबईत यायचा. यावेळी त्याने अनेक संवेदनशील ठिकाणांची रेकी केल्याचा आरोप आहे. हेडलीने याच इमिग्रेशन सेंटरचा कर्मचारी म्हणून व्हिजिटिंग कार्ड छापले होते. पण सुरक्षा यंत्रणांच्या तपासात या इमिग्रेशन सेंटरमध्ये इमिग्रेशन, व्हिजा अथवा इतर कोणतेही काम झालेल्याचे आढळले नाही. हेडली २००६ ते २००८ या दोन वर्षांमध्ये आठ वेळा मंबईत आला होता.