मुंबई : वातानुकूलित लोकल तसेच प्रथम श्रेणीच्या तिकीट दरात गुरुवारपासून कपात होताच त्याला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे. वाढलेला उकाडा आणि कमी झालेले तिकीट दर यामुळे प्रवाशांनी वातानुकूलित लोकल गाडीला पसंती दिली. मध्य रेल्वे मार्गावर वातानुकूलितची २ हजार ३०८ तिकिटांची विक्री (दुपारी दोनपर्यंत ) झाली होती. तर पश्चिम रेल्वेवरही ३ हजार ५२ तिकिटे खरेदी करण्यात आल्या. हा प्रतिसाद इतर दिवसांच्या तुलनेत चांगला असल्याचा दावा मध्य व पश्चिम रेल्वेने केला आहे. सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणीच्या तिकिटांच्या खरेदीतही वाढ झाली आहे.
वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरांत करण्यात आलेली निम्मी कपात गुरुवारपासून अमलात आली. शिवाय सामान्य लोकलच्या (विनावातानुकूलित लोकल) प्रथम श्रेणीचेही भाडेदर कमी झाले असून यामुळे तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. वातानुकूलितच्या तिकीट दरात कपात केल्याने चर्चगेट ते बोरिवलीचे सध्याचे तिकीट १८० रुपयांहून ९५ रुपये, तर सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणीचे भाडेदर १४० रुपयांवरून ८५ रुपये झाले आहे. सीएसएमटी ते कल्याणपर्यंत वातानुकूलितचे तिकीट १०५ रुपये झाले आहे. हाच दर आधी २१० रुपये होता. या मार्गावरील प्रथम श्रेणीचे तिकीटही १६५ रुपयांऐवजी १०० रुपये आकारले जात आहे. अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळापर्यंत वातानुकूलित लोकल धावत असून अध्र्या दरात वातानुकूलितचा प्रवास होणार आहे.
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा तसेच सीएसएमटी ते पनवेल आणि गोरेगाव हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकलच्या ६० फेऱ्या होतात. यातील सकाळच्या काही फेऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळाला.
मध्य रेल्वेवर गुरुवारी दुपारी दोनपर्यंत २ हजार ३०८ आणि प्रथम श्रेणीच्या २ हजार १३२ तिकिटांची वक्री झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. वातानुकूलित लोकलची २ हजार ८०३ तिकिटे आणि प्रथम श्रेणीच्या १ हजार ४६५ तिकिटांची ४ मे ला विक्री झाली. पश्चिम रेल्वेवर दुपारी २ पर्यंत वातानुकूलित लोकलची ३ हजार ५२ तिकिटे, तसेच प्रथम श्रेणीची ३ हजार ८६२ तिकिटे प्रवाशांनी खरेदी केली होती.
४ मे रोजी वातानुकूलित लोकलची ३ हजार ६० तिकिटे आणि प्रथम श्रेणीच्या ४ हजार ९६१ तिकिटांची विक्री झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली. त्यामुळे दिवसभरात यात आणखी वाढ होईल, अशी आशा मध्य व पश्चिम रेल्वेकडून व्यक्त करण्यात आली.
पास दरात कपातीची मागणी
एकीकडे वातानुकूलित लोकलचे तिकीट दर निम्मे करण्यात आले असले तरी, पासचे दर मात्र कायम आहेत. ते दरही कमी करावेत, अशी मागणी प्रवासी करत आहेत. ‘पहिल्याच दिवशी तिकीट काढून प्रवास केला. प्रवास चांगला झाला. मात्र दररोज तिकीट काढून प्रवास करणे शक्य नाही. त्यामुळे पास दरात कपात केली असता तिकीट खिडक्यांच्या रांगेतही उभे राहण्याची कटकट कमी होईल,’ असे मुकुंद चरकरी या डोंबिवलीकर प्रवाशाने म्हटले. रेल्वेने पासदरात कपात केल्यास प्रवाशांचा आणखी प्रतिसाद वाढेल, असे मत त्रृशांत सोंडकर यांनी व्यक्त केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा