मशीद बंदर रेल्वे स्थानकाजवळ गुरुवारी सकाळी ७.१५ च्या सुमारास संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला असून खबरदारी म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने मध्य रेल्वेने उर्वरित ढिगारा हटविण्याचे आणि अन्य कामे हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी गुरुवारी दुपारी दोन तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. या कामासाठी सीएसएमटी ते वडाळादरम्यान लोकल सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.
गैरसोय लक्षात घेता प्रवाशांना मुख्य मार्गावरील दादर आणि कुर्ला मार्गे प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. या ब्लॉकची वेळ लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सकाळी ७.१५ च्या दरम्यान मशीद रोड स्थानक आणि सॅण्डहर्स्ट रोड स्थानकादरम्यानच्या संरक्षक भिंतीचा काही भाग रुळावर कोसळला. यामुळे हार्बर सेवा विस्कळीत झाली. मात्र १५ मिनिटांमध्ये मातीचा ढिगारा हटविण्यात आला होता. मात्र अन्य कामे करण्यासाठी मध्य रेल्वेने दोन तासांचा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे.