मुंबई शहराचे भूषण समजल्या जाणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ (सीएसटी) या ऐतिहासिक वास्तूला दोन वर्षांपूर्वी एलईडी दिव्यांची झळाळी मिळाली खरी, पण या रोषणाईच्या खर्चावरून मध्ये रेल्वे आणि राज्याचे ‘पर्यटन विकास महामंडळ’ यांच्यातील कवित्व अजूनही संपलेले नाही.
मुंबईत येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षणाचे केंद्र असलेल्या या इमारतीला एलईडी दिव्यांच्या माध्यमातून झळाळी मिळावी यासाठी एमटीडीसीने रेल्वेला ४.५ कोटी रुपये खर्च देण्याचे मान्य केले होते. मात्र, यापैकी केवळ एक कोटी रुपयेच रेल्वेला मिळाले आहेत.
मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी या माहितीला दुजोरा दिला. दरम्यानच्या काळात रेल्वेने आपल्या खिशातील पैसे खर्च करून इमारतीच्या रोषणाईचे काम पूर्ण केले. पण, या रोषणाईसाठी एमटीडीसीने मान्य केलेली उर्वरित रक्कम मिळावी यासाठी रेल्वे एमटीडीसीकडे पत्राच्या माध्यमातून गेले वर्षभर पाठपुरावा करते आहे. परंतु, एमटीडीसीने अद्याप हे पैसे रेल्वेला दिलेले नाहीत. बाबत राज्य सरकारच्या ‘पर्यटन आणि संस्कृती विभागा’च्या सचिव वल्सा नायर यांच्याकडे विचारणा केली असता रेल्वेला आम्हाला उर्वरित रक्कम देणे बाकी आहे, असे सांगितले. सरकारकडून आम्हाला हा निधी मिळाल्यानंतर आम्ही रेल्वेचे पैसे देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. गॉथिक शैलीत बांधण्यात आलेल्या या इमारतीला पूर्वी हॅलोजनच्या दिव्यांच्या माध्यमातून रोषणाई करण्यात आली होती.
जवळपास ३०० हून अधिक एलईडी दिवे सध्या या सव्वाशे वर्षे पूर्ण केलेल्या वास्तूची शोभा वाढवीत आहेत. परंतु, हे दिवे बसविण्याचा खर्च कुणी करायचा यावरून रेल्वे आणि एमटीडीसी यांच्यात निर्णय होत नव्हता. लेझर शोचा देखील अजून कागदावरच आहे. चर्चेनंतर हा खर्च एमटीडीसीने देण्याचे मान्य केले.
दिव्यांच्या रचनेत प्रसंगानुसार
बदल करणे शक्य
युनेस्कोचा जागतिक ऐतिहासिक वास्तूचा दर्जा मिळालेल्या या इमारतीला २०१३मध्ये अधिक झळाळी देण्याचा निर्णय घेण्यात आला. आयफेल टॉवर आणि पिसाचा मनोरा या प्रसिद्ध वास्तूंप्रमाणे या इमारतीच्या दर्शनी भागात एलईडी दिवे लावण्याचे ठरले. मुंबईतील एखाद्या इमारतीला या प्रकारची रोषणाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे दिवे साधेसुधे नसून प्रसंगानुसार त्यांच्या रचनेत बदल करता येतो. दिवाळीच्या काळात पणत्या, होळीत रंगांची उधळण, प्रजासत्ताक दिनाला तिरंगा दिसावा या पद्धतीने ही रोषणाई नियंत्रित करता येते. याचबरोबर या दिव्यांमुळे वीज बिल कमी येऊ लागल्यामुळे रेल्वेचा खर्चात बचतही झाली आहे.