राज्याच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चा सुरू असलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कालपासून जोरदार राजकीय घडामोडी सुरू होत्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असं म्हटलं होतं. त्यांनंतर आज सकाळपासूनच भाजपाच्या गोटात वेगवाग हालचाली सुरु असल्याचे दिसून येत होते. त्यावरून भाजपा आपला उमेदवार मागे घेणार असल्याचं निश्चित मानलं जात होतं. अखेर भाजपाने या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. मुराजी पटेल हे आता उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. भाजपाच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून तसेच सर्वसामान्यांमधून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत आणि वेगवेगळे अंदाजही लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाने अशी भूमिका का घेतली? हे भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी व केंद्रीय सरचिटणीस सी टी रवी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Andheri by-election : भाजपाने निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

सीटी रवी म्हणाले, “हे अगोदरपासून चालत आलेलं आहे. शिवाय तशी निवेदनंही आली होती. यामुळे राजकीय गणित बदलणार नाहीत. महाराष्ट्रात एका जागेवर उमेदवार दिला नाही म्हणजे सगळंकाही बदलेल असं नाही. पक्षाने चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. लोकशाही म्हणजे बहुमत. लोकाशाही बहुमताने चालते. मुरजी पटेल चांगले उमेदवार होते, ते शंभर टक्के विजयी होणार होते. परंतु एक प्रथा चालत आलेली आणि ती सुरू ठेवण्याबाबत निवेदनं आल्याने पक्षाने चर्चा करून निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. शेवटी लोकशाहीत चर्चेअंती निर्णय होतो. ही एका व्यक्तीची पार्टी नाही. चर्चा करूनच निर्णय घ्यावा लागतो.”

मोठी बातमी! अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपाची माघार, ऋतुजा लटकेंचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा

तर “मागील निवडणुकीत मुरजी पटेल अपक्ष होते तेव्हा त्यांना ४२ टक्के मतं मिळाली होती. प्रत्येक कार्यकर्त्याबाबत पक्ष विचार करतो. विजयी करणं किंवा पराभूत करणं हे जनतेच्या हातात असतं. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत आम्ही आमची ताकद दाखवू. सगळ्यांच्या निवेदनामुळे आम्ही विचारपूर्वक निर्णय घेतला आहे.” असंही रवी यांनी स्पष्ट केलं.

याचबरोबर “मी पण ३० वर्षांपासून राजकारणात आहे, मला वाटतं निवडणूक दोन पद्धतीने होती. एक पद्धत म्हणजे सहानुभुती आणि दुसरी पद्धत म्हणजे ताकद. ताकदीमुळे आजही आमचा उमेदवार आमचा पक्ष मजबूत आहे. आताही आम्ही मजबूत आहोत. सहानुभुती आहे किंवा नाही हे निवडणूक झाल्यावर समजतं, अगोदर नाही. शंभर टक्के जिंकतील अशी खात्री असणाऱ्या लोकांचाही या अगोदर पराभव झालेला आहे. तर पराभूत होईल असं वाटणारा उमेदवारही जिंकू शकतो. राजकारणात दररोज गणितं बदलतात. त्या मतदारसंघातही आजही भाजपाची ताकद आहे.” असंही रवी यांनी यावेळी बोलून दाखवलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ct ravi said the reason why bjp withdrew from andheri by election msr