मुंबई : धारावीमधील झोपडपट्टीवासीयांना घराजवळ उपचार मिळावेत यासाठी शीव रुग्णालयाने धारावीमध्ये सुरू केलेले प्राथमिक आरोग्य केंद्र मिनी शीव रुग्णालय नावाने प्रसिद्ध असून या आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्यवियक सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत. आता लवकरच या केंद्रामध्ये रुग्णांना सीटी स्कॅन व एमआरआय सुविधाही उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे धारावीतील रुग्णांना सीटी स्कॅन व एमआरआयसाठी शीव रुग्णालय किंवा अन्य खासगी केंद्रावर जाण्याची आवश्यकता भासणार नाही.
मुंबई महारनगपालिकेच्या केईएम, शीव व नायर या रुग्णालयांमधील सीटी स्कॅन व एमआरआय यंत्रणा बंद पडल्यानंतर रुग्णांचा खोळंबा होत होता. मात्र आता या रुग्णालयांमध्ये नवी सीटी स्कॅन आणि एमआरआय यंत्रणा उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे या रुग्णालयांमधील उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळू शकेल अशी अपेक्षा आहे. धारावीकरांना घराजवळ आरोग्य सेवा मिळावी यासाठी धारावीमध्येच आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहे.
शीव रुग्णालयात जाण्याऐवजी धारावीकरांना घराजवळील या आरोग्य केंद्रातच आरोग्य सुविधा मिळत आहे. त्याला नागिरकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र या केंद्रामध्ये सीटी स्कॅन किंवा एमआरआयची व्यवस्था नाही. त्यामुळे रुग्णांना शीव रुग्णालयात किंवा खासगी केंद्रावर जाऊन सीटी स्कॅन किंवा एमआरआय चाचणी करावी लागत आहे. यामुळे रुग्णांना आर्थिक फटकाही सोसावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने या केंद्रावरही सीटी स्कॅन व एमआरआय यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे धारावीतील रुग्णांना याचा फायदा होणार आहे. धारावीतील आरोग्य केंद्रामध्ये अद्ययावत व अत्याधुनिक सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत.