मुंबई : पु. ल. देशपांडे अकादमीच्या नूतनीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करुन नाट्य, चित्रपट कलावंत आणि प्रेक्षकांना रवींद्र नाट्य मंदिर फेब्रुवारी अखेर पर्यंत खुले करु देण्याच्या दृष्टीने कामाचे नियोजन करा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी शुक्रवारी अधिका-यांना दिले.
अकादमीच्या नूतनीकरणाचे काम वेगाने सुरू असून या कामाची पाहणी शेलार यांनी केली. यावेळी अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबधित अधिकारी उपस्थित होते. हे नूतनीकरण करीत असताना कलावंत व प्रेक्षकांना अद्ययावत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असून रवींद्र नाट्य मंदिरात नाटक अथवा चित्रपट सुध्दा पाहता येणार आहे. त्यासाठी मोठी एलईडी स्क्रिन व सिनेमासाठी आवश्यक असणारा डॉल्बी साऊंड सिस्टीम सुध्दा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
तर नाटकांसाठी लागणारी ध्वनिमुद्रण सुविधा अद्ययावत करण्यात आली असून आसन व्यवस्था सुध्दा आरामदायी करण्यात आली आहे. तसेच मिनी थिअटरमध्ये सुध्दा नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम यासह सिनेमासाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
© The Indian Express (P) Ltd