मुंबई : मुंबईतील वांद्रे (पू) येथील ६,६९१ चौरस मीटर जागेवर राज्याचे नवीन महापुराभिलेख भवन बांधण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांनी विधानसभेत शुक्रवारी केली.महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुराभिलेख संचालनालय हा विभाग असून त्याची स्थापना १८२१ मध्ये करण्यात आली होती. संचालनालयाचे मुख्यालय मुंबई येथे असून पुराभिलेख विभागाकडे असलेल्या १७.५ कोटी कागदपत्रांपैकी सुमारे १० कोटी कागदपत्रे मुंबईतील मुख्यालयात आहेत.
१८८९ पासून हे मुख्यालय सर कावसजी रेडिमनी बिल्डिंग म्हणजेच एल्फिस्टन महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये असून, तेथे या कागदपत्रांचे जतन व संवर्धन करण्याचे काम अव्याहतपणे सुरू आहे. काळानुरूप अत्याधुनिक पद्धतीने कागदपत्रांचे जतन व संवर्धन करणे, जुनी कागदपत्रे जतनाकरिता स्वीकारणे अशा अनेक गोष्टींवर जागेअभावी मर्यादा येत आहेत.
पुराभिलेख संचालनालयामध्ये उपलब्ध दुर्मिळ ऐतिहासिक कागदपत्रांचा महत्त्वाचा राष्ट्रीय ठेवा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने पुराभिलेख संचालनालयाच्या वांद्रे (पू) येथे नवीन महापुराभिलेख भवन बांधण्यात येणार आहे. तापमान व आर्द्रता नियंत्रित अभिलेख कक्ष, स्वतंत्र बांधणी शाखा, प्रतिचित्रण शाखा, देशविदेशातून येणाऱ्या इतिहास संशोधकांसाठी अत्याधुनिक संशोधन कक्ष, स्वतंत्र प्रदर्शन दालन अशा अनेक सोयी सुविधांनी युक्त अशी ही इमारत असेल, असे शेलार यांनी सांगितले.