मुंबई : ‘मराठी भाषा गौरव दिनाचे’ औचित्य साधून गुरुवार, २७ फेब्रुवारी रोजी मुंबईतील विविध शाळा व महाविद्यालये, संस्था आणि राजकीय मंडळींकडून सांस्कृतिक व साहित्याशी निगडित वैविध्यपूर्ण कार्यक्रमांद्वारे ‘माय मराठी’चा जागर करण्यात आला. विविध विषयांवरील व्याख्याने, मराठी भाषेसाठी योगदान दिलेल्या व्यक्तींचा सन्मान, पुस्तक प्रदर्शन, चर्चा – संवाद, काव्य, नृत्य, नाट्य आणि सांगीतिक आविष्कार आदी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी मुंबई दुमदुमली होती.

मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि मराठी भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या साहित्यिक व प्रकाशकांना मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे सन्मानित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे ५१ नवीन पुस्तकांचेही प्रकाशन करण्यात आले. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रणीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे मरिन लाइन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परेश दाभोळकर प्रस्तुत ‘बोल मराठी, ताल मराठी’ या मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच लोकाधिकार समिती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी भगवे झेंडे, पताका आणि मराठी भाषा गौरव दिनानिमित्तचे फलक लावून कार्यक्रमस्थळाची सजावट केली होती. विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेले पुस्तक प्रदर्शन वाचकप्रेमींसाठी पर्वणी ठरले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना वडाळा विधानसभेतर्फे उपविभाग अध्यक्ष अॅड. वैभव करंदीकर यांच्या पुढाकाराने माटुंग्यातील रुईया महाविद्यालयासमोर पुस्तक प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, दादर सार्वजनिक वाचनालय, धुरू हॉल ट्रस्ट आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यामाने दादरमधील छबिलदास शाळेच्या गल्लीतील धुरू हॉलमधील पहिल्या मजल्यावरील दासावा सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे काव्य, नाट्य आणि गाण्यांचे मिश्रण असलेला मराठी भाषेची बहुआयामी महती मांडणारा अभिमान सोहळा साजरा करण्यात आला. माटुंगा रोड (पश्चिम) येथील यशवंत नाट्य मंदिर येथे ‘. . . अमृतातेही पैजा जिंके’ या सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी रसिकप्रेक्षकांनी अनुभवली. तसेच मुंबईतील महाराष्ट्र मित्र मंडळाची प्रस्तुती असणाऱ्या या कार्यक्रमात गीत रामायणावर आधारित विशेष नृत्याविष्काराचेही सादरीकरण करण्यात आले.

Story img Loader