मुंबई : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त म्हणजेच ‘मराठी भाषा गौरव दिनाचे’ औचित्य साधून शुक्रवार, २७ फेब्रुवारी रोजी मुंबईतील विविध शाळा व महाविद्यालये, संस्था आणि राजकीय मंडळींकडून सांस्कृतिक व साहित्याशी निगडित वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध विषयांवर व्याख्याने, मराठी भाषेसाठी योगदान दिलेल्या व्यक्तींचा सन्मान, पुस्तक प्रदर्शन, चर्चा – संवाद, काव्य, नृत्य, नाट्य आणि सांगीतिक आविष्कार आदी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची मेजवानी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुंबईकरांना अनुभवता येणार आहे.

मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि मराठी भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांना मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे सायंकाळी ५ वाजता पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार आदी मंत्री व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रणित स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे मरीन लाईन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख व आमदार आदित्य ठाकरे प्रमुख मार्गदर्शन म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपस्थितांना सांगीतिक मेजवानीही अनुभवता येणार आहे. परेश दाभोलकर प्रस्तुत ‘बोल मराठी, ताल मराठी’ हा मराठी गीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे. तसेच स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी भगवे झेंडे, पताका आणि मराठी भाषा गौरव दिनानिमित्तचे फलक लावून कार्यक्रमस्थळाची सजावट केली आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना वडाळा विधानसभेतर्फे उप विभाग अध्यक्ष ॲड. वैभव करंदीकर यांच्या पुढाकाराने माटुंग्यातील रुईया महाविद्यालयासमोर सकाळी १०.३० ते रात्री ९ या वेळेत पुस्तक प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे काव्य, नाट्य आणि गाण्यांचे मिश्रण असलेला मराठी भाषेची बहुआयामी महती मांडणारा अभिमान सोहळा साजरा करण्यात येणार असून माटुंगा रोड (पश्चिम) येथील यशवंत नाट्य मंदिर येथे सायंकाळी ६.३० वाजता ‘ अमृतातेही पैजा जिंके’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील महाराष्ट्र मित्र मंडळाची प्रस्तुती असणाऱ्या या कार्यक्रमात गीत रामायणावर आधारित विशेष नृत्याविष्कारही सादर होईल. तसेच, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, दादर सार्वजनिक वाचनालय, धुरू हॉल ट्रस्ट आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दादरमधील छबिलदास शाळेच्या गल्लीतील धुरू हॉलमधील पहिल्या मजल्यावरील दासावा सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) तंत्रज्ञान मराठी भाषेसाठी किती उपयुक्त’ या विषयावर संगणकक्षेत्रातील शिक्षक भानुदास साटम यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच यावेळी विविध पुरस्कार प्रदान आणि लेख स्पर्धेचे पारितोषिक वितरणही होणार आहे. या कार्यक्रमाला भाजपचे आमदार प्रवीण दरेकर, ज्येष्ठ पत्रकार सचिन परब, कामगार नेते दिवाकर दळवी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Story img Loader