मूलभूत सुविधांचा अभाव

नीलेश अडसूळ

मुंबई : कला विभागांसाठी खास उभारण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक भवनात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. संगीत विभागासाठी रेकॉर्डिग स्टुडिओ, नाटक आणि लोककला यासाठी नाटय़गृह आवश्यक असूनही त्याचा अंतर्भाव या इमारतीत नाही. उद्वाहक बंद असल्याने शिक्षकांची परवड होत आहे.

काही कायदेशीर परवानग्यांची पूर्तता झाली नसल्याने मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलाला लागून असलेले सांस्कृतिक भवन उभारणीनंतर दहा वर्षे वापराविना पडून होते. दरम्यान या इमारतीची आता दुरवस्था झाली आहे. दुरुस्तीची मलमपट्टी करून विद्यापीठाने २०१९ मध्ये नाटय़शास्त्र, संगीत आणि लोककला हे विभाग या इमारतीत हलवले. परंतु अद्यापही पुरेशा सुविधा नसल्याची खंत सांस्कृतिक भवनातून व्यक्त होते आहे.

करोनामुळे सध्या विद्यार्थी येथे येत नसले तरी रेकॉर्डिग स्टुडिओ आणि नाटय़गृह या इमारतीची मुख्य गरज आहे. विद्यापीठात कुसुमाग्रज मराठी भाषा भवन हे नाटय़गृह नाटय़शास्त्र विभगासाठी खुले करून दिले जाते. परंतु हे नाटय़गृह सांस्कृतिक भवनापासून दूर आसल्याने विद्यार्थ्यांना सादरीकरणापेक्षा पडद्यामागच्या मेहनतीसाठी अधिक कष्ट घ्यावे लागतात. 

संगीत विभागात पूर्वी साऊंड इंजिनियरिंगचे प्रशिक्षण दिले जायचे. सांस्कृतिक भवनात स्टुडिओच नसल्याने हा अभ्यासक्रम आता शक्य नाही. शिवाय रेकॉर्डिग स्टुडिओ हा संगीत शिक्षणातील महत्त्वाचा घटक असल्याने त्याची विशेष कमतरता जाणवत आहे.

 केवळ शैक्षणिक सुविधाच नाही तर इमारतीचे रुपडेही सांस्कृतिक भवनाला न शोभणारे आहे. ठिकठिकाणी भिंतींना गेलेले तडे, धुळीने माखलेले जीने, शौचालयातील अस्वच्छता अशा अनेक अडचणींना शिक्षक, विद्यार्थी तोंड देत आहेत. एवढेच नव्हे तर इमारतीचा परिसर भटक्या श्वानांसाठीचे नवे विश्रामगृह बनले आहे.   यासंदर्भात विद्यापीठाशी संपर्क साधला असता तो होऊ शकलेला नाही.

महत्त्वाच्या अडचणी

  • कला क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी वयपरत्वे जीने चढू शकत नात्त. येथील उद्वाहक बंद असल्याने विभागात मार्गदर्शनासाठी येण्यास ते नकार देतात. 
  • रात्रीच्या वेळी घुसखोर सर्रास आत येऊन चोरी करतात. इमारतीतील शौचलयाचे नळ, कडय़ा लंपास केल्या आहेत. 
  • ही इमारत संकुलाबाहेर असल्याने मूळ संकुलात जाताना रस्ता ओलांडण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागते. या ठिकाणी गतिरोधक, सिग्नलची आवश्यकता असूनही त्याकडे विद्यापीठ लक्ष देत नाही. हे विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतणारे आहे.
  •   सध्या इमारतीला पालिकेकडून पाणीपुरवठा होतो, पण पाण्याला दुर्गंधी येत आहे. हे पाणी पिण्यायोग्य नसल्याने येथील सर्वजण घरून पिण्याचे पाणी घेऊन येतात किंवा विकतचे पाणी पिण्यासाठी वापरतात. तर इमारतीच्या एका बाजूला पाणीपुरवठाच होत नाही.
  •   इमारतीत असलेले खुले रंगमंचही दुरवस्थेत आहे.
  •   बाहेरील गाडय़ा, टॅक्सीचालक येथील मोकळ्या जागेचा वाहनतळ म्हणून वापर करतात.