मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाचा कार्यक्रम
माहीम सार्वजनिक वाचनालयाच्या ३९व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात ‘ऋतुनां कुसुमाकर’ कार्यक्रमातून संस्कृत भाषेतील वसंत ऋतूचे वाङ्मयीन दर्शन उलगडले गेले. मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाच्या माजी प्रमुख डॉ. गौरी माहुलीकर यांनी विविध संदर्भ आणि उदाहरणांसह हे वाङ्मयीन दर्शन घडविले.
नेहा खरे व अनघा मोडक यांनी डॉ. माहुलीकर यांची प्रकट मुलाखत घेतली.
‘ऋतुनां कुसमाकर- ऋतुराज वसंत’ या विषयावर विविध प्रश्नांना उत्तरे देताना डॉ. माहुलीकर यांनी कालिदास, जयदेव आणि इतर साहित्यिकांनी आपल्या सहित्यातून वसंत ऋतूचा घेतलेला वेध उदाहरणे देऊन स्पष्ट केला. वसंतोत्सवातून भगवान श्रीकृष्णाला वजा करता येत नाही, असे सांगून वसंतत्त्व आणि श्रीरंगतत्त्व कसे एकच आहे, ते समजावून सांगितले.
वसंत ऋतूत सर्व ऋतू आहेत, असे का मानले जाते, सर्व ऋतूंमध्ये वसंत ऋतूला मुकुटाचे स्थान का देण्यात आले आहे, त्याचेही सविस्तर विवेचन केले. तसेच मराठी साहित्यातही वसंत ऋतूच्या असलेल्या उल्लेखांची माहिती त्यांनी या वेळी दिली.
माहीम वाचनालयातर्फे धनंजय कीर पुरस्कार योजनेंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या एकांकिका लेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळाही या वेळी पार पडला.
कवयित्री नीरजा यांच्या एका दीर्घ कवितेचे नाटय़ रूपांतर करण्याची ही स्पर्धा होती. स्पर्धेतील विजेते अनंत शिंपी यांना डॉ. माहुलीकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वैभवी देशमुख यांनी गायलेल्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली. या वेळी विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा