मुंबईत भांडवली मुल्यावर आधारित मालमत्ता कराची आकारणी सुरू होताच करात भरमसाठ वाढ झाल्याने नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्याच्या पाश्र्वभूमीवर सर्व संबंधितांशी चर्चा करून नागरिकांना त्रास होणार नाही, असा व्यवहार्य तोडगा काढण्यात येईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी विधानसभेत स्पष्ट केले. तसेच मुंबई महानगरपालिकेने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता दिलेल्या ठेक्यात गैरव्यवहार झाल्याचे सकृतदर्शनी आढळून आल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या विशेष चौकशी पथकाकडून (एस.आय.टी.) त्याची चौकशी केली जाईल, अशी घोषणा करून मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला दणका दिला.
भांडवली मुल्यावर आधारित कररचनेमुळे मुंबई शहरातील नागरिकांचे अक्षरक्ष: कंबरडे मोडल्याचा मुद्दा काँग्रेसचे बाबा सिद्दिकी, मधू चव्हाण, अशोक जाधव, राष्ट्रवादीचे नवाब मलिक आदींनी नगरविकास खात्याच्या मागण्यांवरील चर्चेत भाग घेताना उपस्थित केला होता. मालमत्ता कराची आकारणी भांडवली मुल्यावर (कॅपिटल व्ह्य़ॅल्यू) की करमुल्य आधारित (रेटेबल) याचा पर्याय महानगरपालिकांना देण्यात आला होता. मुंबई महानगरपालिकेने भांडवली मुल्यावर आधारित कर आकारणी करण्याचा पर्याय स्वीकारल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी याचे सारे खापर मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर फोडले. उत्पन्न वाढविणे हा हेतू असता कामा नये, अशी सरकारची भूमिका आहे. भांडवली मुल्यावर आधारित कर आकारणीमुळे आर्थिक बोजा वाढल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. या संदर्भात खासदार-आमदार, महानगरपालिकेचे अधिकारी, रहिवाशी संघटनांचे पदाधिकारी या सर्वाशी लवकरच चर्चा करण्यात येणार आहे. यातून तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
क्षेपणभूमी घोटाळ्याची चौकशी
मुलुंड, कांजूरमार्ग आणि देवनार येथील क्षेपणभूमीत (डम्पिंग ग्राऊंड) कचऱ्याची विल्वेवाट लावण्यासाठी करण्यात आलेल्या खासगीकरणात गैरव्यवहार झाल्याचे सकृतदर्शनी आढळून आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.सुमारे तीन हजार कोटींच्या या कामात मोठय़ा प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत काँग्रेसचे बाबा सिद्दिकी यांनी चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार विशेष पथकाकडून ही चौकशी केली जाईल, असे चव्हाण यांनी जाहीर केले.
चौकशीचा फार्स ?
मुंबई महानगरपालिकेतील अनेक गैरव्यवहारांची चौकशी करण्याकरिता समिती नेमण्याची किंवा चौकशी करण्याची घोषणा करण्याची जणू काही प्रथाच पडली आहे. शिवसेनेला शह देण्याकरिता अशा घोषणा केल्या जातात. पण आतापर्यंत शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेवर काहीही कारवाई काँग्रेस आघाडी सरकारने केलेली नाही. तिनईकर समितीने शिवसेनेची सत्ता असलेली मुंबई महानगरपालिका बरखास्त करण्याची शिफारस केली होती. पण त्याचीही अंमलबजावणी झाली नाही.
नवी मुंबईतील धोकादायक इमारतींना वाढीव चटईक्षेत्र
नवी मुंबईत ‘सिडको’ने बांधलेल्या पण सध्या धोकादायक किंवा मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बाधणीकरिता वाढीव चटईक्षेत्र निर्देशांक देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले. नेमके वाढीव चटईक्षेत्र किती द्यायचे याबाबत संचालक, नगरररचना यांचा अभिप्राय मागविण्यात आल्याची माहिती नगरविकास खात्याचे राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी दिली.
सीआरझेडची सवलत म्हाडा इमारतींनाही
सीआरझेडमध्ये मोडणाऱ्या झोपडपट्टी पुनर्विकास योजना, कोळीवाडे किंवा अन्य काही जणांना वाढीव चटईक्षेत्र निर्देशांकाचा वापर करता येतो. मात्र ‘म्हाडा’च्या इमारतींनी ही सवलत मिळत नाही, असा मुद्दा कालिदास कोळंबकर, मधू चव्हाण आदींनी उपस्थित केला. त्यावर म्हाडा इमारतींनाही सीआरझेडच्या नव्या निमयावलीनुसार लाभ मिळण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाबरोबर पाठपुरावा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Story img Loader