बेकायदेशीर शस्त्रे विकणारा मंगेश पगारे याच्याकडून नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येचा उलगडा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या आठवडय़ात त्याला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने कराड येथून ताब्यात घेतले होते. मात्र दहशतवाद विरोधी पथकाने याबाबत काहीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
अंधश्रद्धा निमूर्लन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा तपास राज्य दहशतवाद विरोधी पथक करत आहे. या पथकाने गेल्या आठवडय़ात कराड येथून मंगेश पगारे याला ताब्यात घेतले होते. तो ७.६५ कॅलिबरचे देशी बनावटीचे शस्त्र विकतो. विशेष म्हणजे याच ७.६५ कॅलिबर देशी बनावटीच्या शस्त्राने नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली होती. गेल्या वर्षभरात पगारे याने अशाप्रकारची ३७ पिस्तुले विकल्याचे तपासात समोर आले आहे. पथकाने घातलेल्या छाप्यात अशी १५ पिस्तुलेही जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळे त्याची कसून चौकशी सुरू असून त्याने कोणाकोणाला अशी शस्त्रे विकली आहेत, त्याचा तपास आता पोलीस करत आहेत. त्यामुळे दाभोळकरांच्या मारेकऱ्यांपर्यत पोहोचता येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख राकेश मारिया तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वृत्ताचा इन्कार केला आहे.
दाभोळकरांच्या हत्येचे गूढ उकलणार?
बेकायदेशीर शस्त्रे विकणारा मंगेश पगारे याच्याकडून नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येचा उलगडा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
First published on: 10-11-2013 at 05:46 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Curiosity of narendra dabholkar murder case comes in light