मुंबई: रिझव्र्ह बँकेने चलनातून काढून घेतलेल्या २,००० रुपयांच्या नोटा नागरिकांना मंगळवारपासून (२३ मे) बँकांमधून बदलून मिळणार आहेत. त्यामुळे बँकांमध्ये मोठी गर्दी होण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर रिझव्र्ह बँकेने सर्व बँकांना ग्राहकांना सुविधा पुरविण्याच्या सोमवारी सूचना केल्या.
रिझव्र्ह बँकेने शुक्रवारी २,००० रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय जाहीर केला. याची अंमलबजावणी म्हणून मंगळवारपासून त्या नोटांच्या बदल्यात अन्य मूल्याच्या चलनी नोटा बदलून द्यायला सुरुवात होत आहे. केंद्र सरकारने २०१६ मध्ये नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. त्यावेळी नोटा बदलण्यासाठी बँकांच्या बाहेर लागलेल्या रांगांमध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होता. आता तशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी रिझव्र्ह बँकेने आधीच पावले उचलली आहेत.
आता उन्हाळा सुरू असून, अनेक ठिकाणी तापमानाचा पारा उच्चांकी पातळीवर आहे. या पार्श्वभूमीवर रिझव्र्ह बँकेने सर्व बँकांना उद्देशून काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना सावलीत प्रतीक्षा करण्याची सोय, पिण्याच्या पाण्याची सुविधा आदी गोष्टी उपलब्ध करून द्याव्यात. उन्हाळा असल्याने बँकांनी या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. याचबरोबर बँकांनी दोन हजारांच्या किती नोटा बदलून दिल्या याचा दैनंदिन अहवाल तयार करून देण्यासही सांगण्यात आले आहे.
बँकांना सूचना काय?
- ग्राहकांना प्रतीक्षा करण्यासाठी सावलीची सोय करा.
- ग्राहकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून द्या.
- नित्य पद्धतीने नोटा बदलण्याची सर्व खिडक्यांवर सुविधा द्या.
- किती नोटा बदलल्या याचा दैनंदिन अहवाल ठेवा.