मंगल हनवते, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) मार्गिकेतील कारशेडसाठी आरेमध्ये २५ ते ३० हेक्टर जागेचाच वापर होणार असल्याचे राज्य सरकार आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) सांगितले जाते. त्यामुळे सध्या २४० डबे राहू शकतील, यादृष्टीने कारशेड बांधले जात असले तरी २०३१ मध्ये डब्यांची संख्या ४४० होणार असून, त्यासाठी सध्याची जागा अपुरी पडणार असल्याचे मेट्रो ३ च्या आराखडय़ात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. 

‘एमएमआरसी’ने ३३ हेक्टर जागेत कारशेड प्रस्तावित केले आहे. प्रत्यक्षात आरेतील अंदाजे ६१ हेक्टर जागा संपादित करण्यात आली आहे. यातील २५ हेक्टर जागेवर कारशेड उभारण्यात येणार असून, ५ हेक्टर जागा हरित क्षेत्र म्हणून राहणार असल्याचे ‘एमएमआरसी’कडून सांगितले जात आहे. 

मेट्रो ३ च्या आराखडय़ानुसार मेट्रो ३ साठी २०२५ मध्ये ४७ गाडय़ांची तर २०३१ मध्ये ५५ गाडय़ांची गरज लागणार आहे. सुरूवातीला या गाडय़ा सहा डब्यांच्या होत्या. मात्र पुढे त्या आठ डब्यांच्या करण्यात आल्या असून त्यानुसारच गाडय़ांची बांधणी सुरू आहे. अशावेळी सध्या २४० डबे ठेवता येईल, अशी कारशेड बांधण्यात येणार आहे. मात्र २०३१ मध्ये डब्यांचा आकडा ४४० वर जाणार आहे. त्यामुळे २५ हेक्टरमधील कारशेड अपुरे पडणार असल्याचे आराखडय़ात स्पष्ट करण्यात आले आह़े 

राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालातही ही बाब नमूद करण्यात आली आहे, अशी माहिती वनशक्तीचे दयानंद स्टॅलिन यांनी दिली. त्यामुळे कारशेडसाठी ‘एमएमआरसी’कडून अंदाजे ६१ हेक्टर जागा वापरली जाऊ शकते. कारशेडच्या नावाखाली इतके मोठे जंगल नष्ट केले जाऊ शकते, अशी भीती आरे संवर्धन गटाने व्यक्त केली आहे. 

कारशेडसाठी केवळ २५ हेक्टर इतकीच जागा लागणार असून, त्यासाठी झाडे कापण्याची गरजही लागणार नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने सांगत आहेत़  मात्र, ही दिशाभूल असून, कारशेडच्या नावाखाली आरे जंगल नष्ट करण्याचा हा डाव असल्याचा आरोप आरे संवर्धन गटाने केला आहे. याबाबत ‘एमएमआरसी’च्या प्रवक्त्यांशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही.