मुंबईत एकटय़ा राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या हत्या होण्याच्या घटना वाढत असतानाच पवई येथे ६२ वर्षीय महिलेवर घरात घुसून बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कुरियर देण्याच्या बहाण्याने घरास घुसून आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार या महिलेने दिल्यानंतर पोलिसांनी बोरिवली येथून अशोक कुमार (४२) याला अटक केली.  
पवई येथे एकटय़ा राहणाऱ्या या महिलेच्या पतीचे काही वर्षांपूवीज्ञ निधन झाले. या महिलेची मुलगी परदेशी स्थायिक असून मुलगा बंगळूर येथे खाजगी विमान कंपनीत कामाला आहे. कुरियर देण्याच्या बहाण्याने एक इसम तिच्या घरात शिरला. संबंधित महिला एकटी असल्याचा गैरफायदा उठवत त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर घरातील काही किरकोळ वस्तुंची चोरी करुन तो पळून गेला. या घटनेनंतर महिलेला रक्तस्त्राव सुरू झाल्याने तिला बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
या महिलेने दिलेल्या वर्णनावरुन पोलिसांनी आरोपीचे रेखाचित्र तयार केले. तसेच त्या महिलेच्या मोबाईलवर आलेले कॉल्स आणि एसएमएसचा शोध घेऊन बोरिवली येथून अशोक कुमारला अटक केल्याची माहिती पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव भोसले यांनी दिली.
हा आरोपी महिलेला पुर्वीपासून ओळखत असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. त्याच्यावर बलात्कार आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी अशोक याची डीएनए चाचणी सुद्धा करण्यात येणार आहे.

Story img Loader