देश आणि राज्य पातळीवर सध्या भ्रष्टाचाराचे सर्रास आरोप केले जात आहेत. त्यामुळे देशात केवळ भ्रष्टाचार सुरू आहे, असे चित्र निर्माण होऊन सर्वसामान्यांनाचा लोकशाहीवरील विश्वास उडेल आणि देशात अराजकता माजेल, असे मत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी नवी मुंबईत व्यक्त केले.
प्रत्येक गोष्ट नियमांवर बोट ठेवून करता येत नाही. कधी कधी लोकांसाठी ‘आऊट ऑफ द वे’ जाऊन काम करावे लागते, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता लगावला.
नवी मुंबई पालिकेतर्फे एमआयडीसी भागातील रस्त्यांचे क्रॉँक्रीटीकरण आणि ठाणे -बेलापूर मार्गावरील अंतर्गत मार्गाच्या कामाचा शुभारंभ पवार यांच्या हस्ते महापे येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री गणेश नाईक, सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, महापौर सागर नाईक, खा. डॉ. संजीव नाईक, आ. नरेंद्र पाटील, एपीएमसीचे अध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पवार म्हणाले की, भ्रष्टाचाराचे आरोप करीत केजरीवालसारख्या माणसाने पक्ष काढण्याचा निर्णय घेतला आहे. लोकशाहीत हा अधिकार सर्वाना आहे. पण केवळ भ्रष्टाचाराचे आरोप करून उपयोग नाही. राजकीय पक्षांनी केलेल्या चांगल्या कामांनाही पाठिंबा देण्याची आवश्यकता आहे. भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुकीत दहापैकी नऊ पालिकांवर आघाडीची सत्ता आली आहे. त्यामुळे लोकांना सर्व काही कळते हे यातून स्पष्ट होते, असे पवार यांनी सांगितले. मला कोणी राजीनामा द्यायला सांगितला नव्हता. तसा कोणी सांगितला असता तर माझ्या स्वभावानुसार मी तो दिलाही नसता असा पुनरुच्चार त्यांनी केला.
एमएमआरडीएने मुंबईतच लक्ष घातले आहे. तेथील विकास केला आहे. त्यामुळे एमएमआरडीएची हद्द मुंबई आणि उपनगरापुरती ठेवून पीएमआरडीएप्रमाणे ठाण्यासाठी वेगळे प्राधिकरण स्थापन करण्यात यावे अशा मागणी त्यांनी केली. यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबर लवकरच बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या शहरात राज्यकर्त्यांना चूक करण्याची परवानगी दिली आहे असे समजण्याचे कारण नाही असे त्यांनी बजावले.
व्हिडीओकॉनची जमीन अन्य प्रकल्पाला
राज्य सरकारच्या संमतीने व्हिडीओकॉन उद्योगसमूहाला नवी मुंबईत एलसीडी प्रकल्प उभारण्यासाठी चार वर्षांपूर्वी २५० एकर जमीन केवळ ३०० कोटी रुपयांना देण्यात आली होती. या उद्योगसमूहाने चार वर्षांत या जमिनीचा विकास न केल्याने ती आता अन्य प्रकल्पाला देण्याचा विचार करण्यात येईल, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली. लोकसत्ताच्या बातमीवर पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली. उपमुख्यमंत्री असताना आपल्या भाषणात आयोजकांवरच शब्दांचे आसूड ओढणारे पवार हे पद गेल्यानंतर बरेच मवाळ झाल्याचे दिसून येत होते. स्वत:चा उल्लेख ते कार्यकर्ता असा सातत्याने करीत होते.
भ्रष्टाचाराच्या आरोपाने अराजकता माजेल
देश आणि राज्य पातळीवर सध्या भ्रष्टाचाराचे सर्रास आरोप केले जात आहेत. त्यामुळे देशात केवळ भ्रष्टाचार सुरू आहे, असे चित्र निर्माण होऊन सर्वसामान्यांनाचा लोकशाहीवरील विश्वास उडेल आणि देशात अराजकता माजेल, असे मत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी नवी मुंबईत व्यक्त केले.
First published on: 09-11-2012 at 06:28 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Curruption charges will make anti politics