मुंबई: संयुक्त अरब अमिराती येथून तस्करी करून आणलेली ११२ टन सुपारी सीमाशुल्क विभागाने जप्त केली आहे. नवी मुंबईतील न्हावा-शेवा बंदरात १० कंटेनरमध्ये ही सुपारी सापडली.  गेल्या १० दिवसांत न्हावा-शेवा बंदरातून ३०० मेट्रिक टनाहून अधिक सुपारी जप्त करण्यात आली असून त्याची किंमत सुमारे १५ कोटी रुपये आहे.

सुपारीच्या आयातीवर भारतात मोठया कर आकारण्यात येत असल्यामुळे काही टोळया सुपारी तस्करीत सक्रिय झाल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे न्हावा-शेवा बंदरात एक विशेष मोहीम राबविण्यात आली.  माहितीच्या आधारे बंदरातील अनेक कंटेनरची तपासणीत करण्यात आली. त्यापैकी १० कंटेनरमध्ये तस्करी करून सुपारी आणण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचा >>> महायुती विरुद्ध मविआ; विधान परिषदेच्या मुंबई कोकण पदवीधर मतदारसंघांत थेट लढत

डांबराच्या नावाखाली तस्करी

सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे मोठया प्रमाणात डांबर आणि गळती रोखणाऱ्या इतर वस्तूंच्या मागणीत वाढ झाली आहे. आरोपी याचाच फायदा घेऊन डांबराच्या नावाखाली सुपारीची तस्करी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याकडे पान मसाल्याचे मोठय़ा प्रमाणात सेवन केले जाते. परदेशातून कायदेशीररीत्या सुपारीची आयात केल्यास ११० टक्के वस्तू व सेवा कर द्यावा लागतो. त्यामुळे सुपारीची किंमत दुपटीनेही वाढते. परिणामी, कर चुकवण्यासाठी मोठय़ा प्रमाणात सुपारीची तस्करी करण्यात येते.

वापी येथून आरोपीला अटक

सीमाशुल्क विभागाने गेल्या १० दिवसांत न्हावा-शेवा बंदरातून ३०० मेट्रिक टनाहून अधिक सुपारी जप्त केली आहे. याची किंमत सुमारे १५ कोटी रुपये आहे.  त्या प्रकरणात मुख्य आरोपी मुकेश भानुशाली याला गुजरातमधील वापी येथून अटक करण्यात आली होती.

Story img Loader