मुंबई : मागील आठवड्यात सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर एका प्रवाशाकडून पाच सियामंग गिबन्स जप्त केले होते. यापैकी दोन सियामंग गिबन्सना इंडोनेशियात परत पाठवण्यात आले आहे. यापैकी तीन गिबन्सचा गुदमरल्याने, तसेच निर्जलीकरणामुळे मृत्यू झाला. दरम्यान, भारतात प्राण्यांची तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधित प्रवाशाला चौकशी आणि कायदेशीर कारवाईसाठी वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे.
क्वालालंपूर येथून ५ फेब्रुवारी रोजी रात्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका संशयीत प्रवाशाला सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी रोखले. विमानतळावरील नियमित तपासणीदरम्यान सीमाशुल्क अधिकाऱ्यांना या संशयित प्रवाशाकडे ५ सियामंग गिबन्स सापडले. प्रवाशाने ट्रॉली बॅगमधील प्लास्टिकचा बॉक्स आणि छोट्या पिंजऱ्यात या सियामंग गिबन्सना दडवले होते. मृत्यू झालेल्या तीन गिबन्सना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. अन्य दोन गिबन्सना तात्काळ वैद्यकीय उपचार देण्यात आले. अवैध तस्करीमुळे या दोन गिबन्सची प्रकृती चिंताजनक होती. जवळपास ७२ तासांहून अधिक काळ त्यांच्यावर तीन पशुवैद्यांच्या पथकाने उपचार केले. उपचारादरम्यान या दोन गिबन्सची प्रकृती स्थिर असल्याचे घोषित करण्यात आले. विमानतळावरून जप्त करण्यात आलेल्या या गिबन्सच्या नाकातून रक्तस्त्राव होत होता. तसेच डोळ्याला संसर्ग झाला होता, अशी माहिती ‘रेस्कूइंक असोसिएशन फॉर वेल्फेअर’ (रॉ) या वन्यजीव संस्थेचे अध्यक्ष पवन शर्मा यांनी दिली.
लुप्तप्राय प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्याच्या परिशिष्ट १ आणि वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ च्या अनुसूचीमध्ये गिबन्स संरक्षित प्रजाती आहेत. दुर्मिळ आणि धोक्यात असलेल्या ही प्रजाती प्रामुख्याने आग्नेय आशियातील काही भागात आढळतात आणि आंतरराष्ट्रीय वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत त्यांना संरक्षण देण्यात आले आहे. गिबनपैकी सर्वात मोठा सियामंग इतर गिबनच्या दुप्पट आकाराचा असतो. सिम्फॅलॅंगस वंशातील ही एकमेव प्रजाती आहे. सियामंगच्या दोन उपप्रजाती आहेत. यामध्ये सुमात्रन सियामंग आणि मलेशियन सियामंग या प्रजातींचा समावेश आहे. तस्करीमुळे सियामंग ही प्रजाती धोक्यात आली आहे. याचबरोबर इंडोनेशिया आणि मलेशिया या दोन्ही देशांमध्ये त्यांचा अधिवासही नष्ट होऊ लागला आहे. सियामंगचे केस लांब, दाट असतात. सियामंगची सरासरी लांबी ९० सेमी असते. सियामंग प्रामुख्याने आहार म्हणून जंगलातील विविध वनस्पती खातात. त्यांच्या आहारात ६० टक्के फळांचा समावेश असतो. त्यांचा मुख्य अन्नस्त्रोत अंजीर आहे. सियामंग प्रामुख्याने इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडच्या जंगलात आढळतात.