मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बँकॉकवरून तस्करी केलेले चार धनेश पक्षी (हॉर्नबिल) सीमाशुल्क विभागाने ताब्यात घेतले. तस्करी करणाऱ्या दोन भारतीय प्रवाशांना अटक करण्यात आली.

विमानतळावर सोमवारी उतरलेल्या दोन प्रवाशांचे सामान संशयास्पद दिसल्यामुळे झडती घेण्यात आली. त्यांच्या सामानात दोन चॉकलेट भरलेले डबे आणि चॉकलेटखाली चार धनेश पक्षी सापडले. या पक्ष्यांची थायलंडमधून तस्करी करण्यात आली होती.

हेही वाचा…ट्वीटद्वारे १० विमानांमध्ये बॉम्बची धमकी, सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, विमान धमकीप्रकरणी १० वा गुन्हा

सीमाशुल्क विभाग, वाईल्ड लाइफ क्राइम कंट्रोल ब्युरो, वन विभाग आणि रेस्किंक असोसिएशन फॉर वाइल्ड लाइफ वेलफेअर (रॉ) यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत तस्करी केलेले चार धनेश पक्षी ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक उपचार करून ते पुन्हा थायलंडला रवाना करण्यात आले. दरम्यान, ही प्रजाती ‘संकटग्रस्त’ यादीत समाविष्ट असून या पक्ष्यांची मोठ्या प्रमाणावर तस्करी करण्यात येते.