मुंबई : सीमा शुल्क विभागाने मुंबई विमानतळावर केलेल्या कारवाईत सहा किलो सोने व २१४७ कॅरेट हिरे जप्त केले असून त्यांची किंमत सव्वानऊ कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आरोपी प्रवाशाने पट्ट्यामध्ये सोने लपवले होते. तसेच लॅपटॉपमध्ये हिरे सापडले. गेल्या काही दिवसांत बँकॉकहून गांजाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असून त्यातील पैशांची हवालामार्फत देवाण-घेवाण करण्यासाठी हिऱ्यांची तस्करी केली जात होती का याबाबत सीमाशुल्क विभाग तपास करीत आहे.
सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर ११ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ५ किलो ९२ ग्रॅम सोने आणि २१४७ कॅरेट हिरे जप्त केले. त्यांची किंमत अंदाजे ९ कोटी १२ लाख रुपये आहे. तस्करी करणाऱ्या प्रवाशांनी पट्ट्याचे बक्कल, ट्रॉली बॅग आणि अंतर्वस्त्रांमध्ये सोने लपवले होते. तर प्रवाशाच्या ट्रॉली बॅगमधील लॅपटॉपमध्ये हिरे दडविण्यात आले होते. या प्रकरणात एका प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा तपासणी आणि स्कॅनिंग प्रक्रियेदरम्यान केंद्रीय औद्योगित सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) अधिकाऱ्यांना एका प्रवाशाच्या लॅपटॉपमध्ये संशयास्पद वस्तू आढळल्या. हा प्रवासी मुंबईहून बँकॉकला प्रवास करीत होता. संशय आल्याने त्याला तातडीने विमानतळाच्या एअर इंटेलिजन्स युनिटकडे (एआरयू) सुपूर्द करण्यात आले. कसून तपास केल्यानंतर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी त्या प्रवाशाकडून २१४७ कॅरेट हिरे जप्त केले. त्याची किंमत चार कोटी ९३ लाख रुपये आहे. याप्रकरणी प्रवाशाला अटक करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून बँकॉकहून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जात आहे. हे हिरे त्याच्या हवाला व्यवहारांशी संबंधित असल्याचा संशय असून त्याची पडताळणी सुरू आहे.
दुसऱ्या कारवाईत १२ फेब्रुवारीला दुबईहून मुंबईत आलेल्या तीन प्रवाशांना अडवण्यात आले. त्यांच्याकडून २४ कॅरेट सोन्याच्या अंगठ्या आणि बटण असे एकूण ७७५ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. त्याची किंमत ६१ लाख रुपये आहे. तिसऱ्या कारवाईत केनियाच्या १४ प्रवाशांना अडवण्यात आले. हे प्रवासी नैरोबीहून मुंबईला आले होते. तपासादरम्यान, त्यांच्या अंतर्वस्त्रांमध्ये आणि कपड्यांच्या खिशात लपवलेले २२ कॅरेट वितळवलेले सोन्याचे बार आणि दागिने सापडले. जप्त सोन्याचे वजन २७४१ ग्रॅम आहे. त्याची किंमत एक कोटी ८५ लाख रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. याशिवाय आणखी एका कारवाईत २४०६ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले.