अणू बॉम्बमुळे मोठी हानी होऊ शकते, त्याप्रमाणे सायबर गुन्ह्यातून खूप मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे इंटरनेटवर सुरक्षितरित्या आणि जबाबदारीने कामे करणे आवश्यक आहे. गेल्या दहा वर्षांपासून ‘रिस्पॅान्सिबल नेटिझम’ ही संस्था सामाजिक जबाबदारीतून अबालवृद्धांना सायबर सुरक्षेबाबत सजग करीत आहेत. सायबर गुन्ह्यांबाबत आताच जागृत राहिले नाही तर, भविष्यात मोठ्या धोक्याला सामोरे जावे लागेल, असे मत पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा य़ांनी व्यक्त केले. महिला व बालकांची ॲानलाईन सुरक्षितता व सायबर जागृतीसाठी काम करणाऱ्या ‘रिस्पॅान्सिबल नेटिझम’ या सामाजिक संस्थेच्या दहावा वर्धापन दिनानिमित्त चर्चगेट येथील आयएमसी चेंबरमध्ये शनिवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी लोढा बोलत होते.
हेही वाचा- मुंबईमधील आरेमध्ये बिबट्याचे हल्ले सुरूच; आदर्श नगरमधील हल्ल्यात महिला जखमी
‘रिस्पॅान्सिबल नेटिझम’चा राज्यात सायबर जागृती केंद्र सुरू करण्याचा मानस आहे. त्यासाठी सरकार मदत करेल. प्रत्येकाने इंटरनेटचा वापर सजगतेने करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.रिस्पॅान्सिबल नेटिझमतर्फे सायबर जनजागृतीसाठी हेल्पलाईन लोकार्पण, तसेच महिला व बालकांच्या संदर्भातील सायबर गुन्ह्यांचा तपास आणि कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन पुस्तिकेचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त पोलीस महासंचालक ब्रिजेश सिंग, वरिष्ठ सायबर विधिज्ञ वैशाली भागवत, एसएनडीटीच्या मानसशास्त्र विभागाच्या माजी विभाग प्रमुख अनुराधा सोवनी, ‘रिस्पॅान्सिबल नेटिझम’च्या संस्थापक सोनाली पाटणकर, सहसंस्थापक उन्मेष जोशी उपस्थित होते.