लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: कुरिअर कंपनीचा संपर्क क्रमांक सर्च इंजिनवर शोधणे वृद्ध व्यक्तीला भलतेच महाग पडले. आरोपीने वस्तू व सेवा कर (जीएसटी) भरण्याच्या बहाण्याने ६९ वर्षीय तक्रारदाराच्या खात्यातून एक लाख रुपये काढले. याप्रकरणी मालाड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांनी १४ मे रोजी बंगळुरू – मुंबई असा प्रवास केला. त्यावेळी त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर साहित्य होते. त्यामुळे त्यांनी चालकाला काही साहित्य कुरिअरमार्फत पाठवण्यास सांगितले. चालकाने कुरिअरमार्फत साहित्य पाठवल्यानंतर तक्रारदारांना पावती पाठवली.

हेही वाचा… ‘मेट्रो १२’ मार्गिकेच्या बांधकामासाठी ११ कंपन्या स्पर्धेत

तक्रारदारांना २९ मे रोजी इंटरनेटवर एका कुरिअर कंपनीचा ग्राहक सेवा संपर्क क्रमांक सापडला. त्यावर त्यांनी दूरध्वनी केला असता समोरील व्यक्तीने आपण कुरिअर कंपनीतील राहुल शर्मा असल्याचे सांगितले. त्यांच्या कुरिअर शुल्कावरील जीएसटीचे पाच रुपये भरणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे त्याचे पार्सल अडकले आहे, असे त्या व्यक्तीने सांगितले. त्यावेळी शर्माने जीएसटी भरण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने यूपीआयशी जोडलेले बँक खाते उघडण्यास सांगितले. त्यानंतर पाच रुपये भरण्याची प्रक्रिया करण्याच्या नावाखाली तक्रारदारांच्या खात्यातून ९९ हजार ९९९ रुपये काढले. याबाबत संदेश प्राप्त झाल्यानंतर तक्रारदारांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी गुरुवारी मालाड पोलिसात जाऊन सायबर फसवणुकीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी फसवणूक व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तक्रारदारांच्या बँक खात्याची माहिती मागवली असून त्याद्वारे अधिक तपास करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.