मुंबईः फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकल्याची धमकी देऊन अंधेरीतील महिलेची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना दहिसर पोलिसांनी अटक केली. आरोपींनी सायबर फसवणूक करणाऱ्यांना बँक खाती उपलब्ध केल्याचा आरोप असून त्यांनी बँकांमध्ये उघडलेले १० हून अधिक खाती गोठविण्यात पोलिसांना यश आले आहे. या कटात इतर आरोपींचा शोध सुरू असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

तक्रारदार महिला दहिसर येथे वास्तव्याला असून अंधेरीतील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. त्यांचे पती अभियंता आहेत. महिला २८ नोव्हेंबर रोजी घरी असताना त्यांना सारिका शर्मा नावाच्या महिलेचा दूरध्वनी आला होता. आपण दिल्ली टेलिकॉम कंपनीतून बोलत असून आधारकार्ड लिंक झाले आहे. याच आधारकार्डवरून काही मोबाइल क्रमांकाचे नोंदणीकरण झाले आहेत. या मोबाइलवरून लखनऊ शहरातील तीन बँकांमध्ये तिच्या नावाने बँक खाती उघडण्यात आले आहेत. त्यात अनेकांची फसवणूक झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी लखनऊ पोलिस करीत असल्याचे सांगून तिने दुसऱ्या क्रमांकावर दूरध्वनी वळवला.

हेही वाचा – बेस्ट बस अपघात : राजकारण तापले, चौकशीची भाजपची मागणी, भाडेतत्वावरील बस गाड्यांवरून आदित्य ठाकरे लक्ष्य

सुनीलकुमार नाव सांगणाऱ्या या व्यक्तीने तो गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानेही तिला तीच माहिती सांगून तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून या गुन्ह्यांत तिला किमान दहा वर्षांची शिक्षा होऊ शकते अशी भीती दाखविण्याचा प्रयत्न केला. बोलण्यात गुंतवून त्याने तिला काही रक्कम हस्तांतरित करण्यास प्रवृत्त केले. त्याच्यावर विश्वास ठेवून तिने त्याला काही रक्कम हस्तांतरित केली. दुसऱ्या दिवशी त्याने तिला पुन्हा दूरध्वनी करून आणखी पैशांची मागणी केली. पैसे दिले नाहीतर तिच्यावर अटकेची कारवाई केली जाईल, अशी धमकी दिली. यावेळी तिने त्याला पैसे देण्यास नकार देऊन तिचे बँक खाते ब्लॉक केले.

हेही वाचा – ३ कोटी लोकांची क्षयरोग तपासणी

हा फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच तिने दहिसर पोलिसांसह सायबर हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगांविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच दहिसर पोलिसांनी तपास सुरू करून तांत्रिक माहितीवरून वरुणकुमार तिवारी आणि सचिन मिश्रा या दोघांना संशयित आरोपी म्हणून मिरारोड येथून ताब्यात घेतले. तपासात या दोघांचा गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला. ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांना बँक खाती पुरविण्याचे काम ते दोघेही करीत होते. या दोघांनी आतापर्यंत १० हून अधिक बँक खाती उघडली आहे. याच बँक खात्यात फसवणुकीची रक्कम जमा झाल्याचे तपासात उघडकीस आले. त्यामुळे पोलिसांनी संंबंधित बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ती सर्व खाती बंद केली.

Story img Loader